शहापुरात सेंद्रिय हळद लागवडीतून एकरी दहा लाखांचे उत्पन्न
शहापूर: सांगली, सातारा, विदर्भ आणि मराठवाड्यात घेतली जाणारी हळद ठाणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात घेतली जाऊ लागली आहे. एकरी आठ ते दहा लाखांचे उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांना नवीन आर्थिक स्त्रोत मिळाला आहे. शहापूर तालुक्यातील सेंद्रिय हळद लागवडीचा पॅटर्न कोकणात राबविल्यास भविष्यात कोकणातील चित्र आणखी वेगळे पाहायला मिळेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.
राज्यात पूर्वी काही पिकांची विशिष्ट भागातच लागवड केली जात असे. आता मात्र पीक पद्धतीत बदल होत असून सांगली-सातारा, विदर्भ, मराठवाडा आदी भागात घेतल्या जाणाऱ्या हळदीची लागवड आता कोकणातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पाहायला मिळत आहे.
पूर्वी किचकट मानले जाणारे हळद उत्पादन आता शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न देत आहे. शहापूर तालुक्यातील बेंडेकोन येथील शेतकरी रामनाथ उंबरगोंडे यांनी सुरवातीला अर्धा एकर जागेमध्ये प्रगती जातीच्या हळदीची लागवड केली असून सर्व खर्च वजा करून त्यांना दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. पूर्वी हळद काढणीची प्रक्रिया अवघड असल्याने शेतकरी लागवडीला कचरत असत. नवखे शेतकरी हळदीचा विचारही करत नव्हते. आता मात्र ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पुढे सरसावले असून हळदीची पिके घेत एकरी आठ ते दहा लाख रुपयांचेही उत्पन्न घेत आहेत.
हळद ही शेतावर आंतरपीक म्हणून घेता येते. हळदीच्या काढणीसाठी लागणारे मनुष्यबळ, काढणी झाल्यावर शिजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणार लाकूड-फाटा तसेच ही हळद सुकवून पुन्हा मशीनमध्ये तिची पावडर बनवून ती पॅकिंग करून विक्रीसाठी बाजारात आणली जाते. ही हळद पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे तिला बाजारात एक किलोमागे 400 ते 500 रुपये भाव मिळत आहे. पुढील काळात ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळद लागवड होऊन शेतकऱ्यांना जोड धंद्यासोबत चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
घरगुती वापरासाठी किंवा विक्रीसाठी ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली हळद हवी असल्यास रामनाथ उंबरगोंडे यांना 9209221572 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत घरत आणि श्रेयस वेखंडे यांनी केले आहे.
हळदीचे पीक कोकणातही उत्तम प्रकारे येत असून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यास चांगला भाव देखील मिळत आहे. भात उत्पादनाला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हळद लागवड करावी. तसेच ग्राहकांनी घरगुती वापरासाठी तसेच विक्रीसाठी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या हळदीची मागणी करून स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे सामाजिक कार्यकर्ते श्रेयस वेखंदे यांनी सांगितले.
शहापूर तालुक्यात उन्हाळी आणि पावसाळी भातपीक घेतले जाते. परंतु त्यासोबत हळद पीक घेतल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. कृषी विभागामार्फत अनुदान देखील मिळते, अशी माहिती रामनाथ उंबरगोंडे यांनी दिली.