राजस्थानातून पाऊण कोटीचे एमडी आणणारे तस्कर जेरबंद

ठाणे: राजस्थानातून एमडीची वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने ठाण्याच्या वेशीवर मुसक्या आवळल्या आहेत. सुरेशसिंह तंबर (३५) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी पाऊण कोटीचे एमडी जप्त केले आहे. हे एमडी त्याने ठाण्यातील साथीदारांना विक्री करण्यासाठी आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी राजस्थान येथून छुप्या मार्गाने एमडीची तस्करी होत असल्याची माहिती गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी कारमधून नाशिक महामार्गाने ठाण्यात येणार असल्याचे समजताच पथकाने जुन्या खारीगाव टोलनाक्याजवळून मुंब्राकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला. यावेळी पोलिसांनी संशयित मध्यप्रदेश पासिंगची पांढऱ्या रंगाची कार ताब्यात घेतली. या कारची झडती घेतली असता गाडीतून तब्बल ७५ लाख २२,५०० रुपयांचे ५०१.५० ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळाले.

पोलिसांनी सुरेशसिंह तंबर याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने हे एमडी ठाण्यातील कुलदीपसिंह परिहार व अभिषेक जैस्वाल यांना विक्री करण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी कुलदीपसिंह याला देखील अटक केली आहे. या दोघांची रवानगी न्यायालयाने पोलीस कोठडीत केली आहे. सुरेशसिंह हा मध्यप्रदेश व राजस्थान सीमेवर असलेल्या गावातून हे एमडी व्रिकीसाठी आणत असल्याचे तपासात समोर आले असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.