मुंबई: गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे पाच लाख ९६ हजारपेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले.
यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकण वासियांसाठी पाच हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेसद्वारे १५,३८८ फेऱ्यांतून पाच लाख ९६ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. अर्थात, एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघात विरहित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल पाच हजार बसेसद्वारे पाच लाख ९६ हजारपेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. अर्थात, यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजारपेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली, ते कौतुकास्पद आहे , असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.