शहापूर: शहापूर तालुक्यातील वन विभागातील वनपाल व वनरक्षक यांनी उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवत तालुक्याची मान उंचावली आहे. वनसंरक्षण व वनसेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ठाणे वन वृत्तातील वनपाल संवर्गातील राजाराम मांजे यांना रजत पदक तर वनरक्षक संवर्गातील प्रविण विशे यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे.
वन विभागामार्फत राज्यातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत दरवर्षी गौरव करण्यात येतो. त्याअंतर्गत वनसंरक्षण, वनसंपत्तीचे संवर्धन, वन्यजीव संरक्षण तसेच जनजागृती यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येते.यंदाच्या गौरव सोहळ्यात शहापूर तालुक्यातील वनपाल राजाराम मांजे यांच्या प्रभावी व कर्तव्यदक्ष सेवेला मान्यता देत त्यांना रजत पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच वनरक्षक प्रविण विशे यांनी वनसंरक्षणासाठी केलेल्या धाडसी कार्याची दखल घेत त्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.
या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या गौरवामुळे शहापूर वनपरिक्षेत्रासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून सहकारी अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. वनसंवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
वनसंरक्षणासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने केलेल्या कार्याची शासनाने दखल घेऊन वनपाल राजाराम मांजे यांना रजत पदक व वनरक्षक प्रविण विशे यांना सुवर्ण पदक मिळणे ही आमच्यासह संपूर्ण शहापूर वनविभागाच्या अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशामुळे वन विभागातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया विहिगाव वनपरिक्षेत्र अधिकारी संदिप तोरडमल यांनी दिली.
हे पदक केवळ आमचे नसून संपूर्ण वनविभागातील सहकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. पुढेही वन संवर्धन आणि संरक्षणासाठी अधिक जबाबदारीने काम करत राहू, अशी भावना रजत पदक विजेते वनपाल राजाराम मांजे यांनी दिली.