मंगळवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर मिझोरामचा 97 धावांनी पराभव करत सिक्कीमने सध्या सुरु असलेल्या वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये पहिला विजय नोंदवला.
प्रेतिका छेत्री (१२३ चेंडूत ९१ धावा; ४×८, ६×१) आणि समायता रॉय प्रधान (७५ चेंडूत नाबाद ९३; ४×११) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सिक्कीमने 50 षटकांत सात गडींच्या मोबदल्यात 281 सारखी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या ठिकाणी त्यांचा दुसरा सामना खेळताना, सिक्कीमने चांगली सुरुवात केली, त्यांचे सलामीवीर छेत्री आणि युडेन (67 चेंडूत 38 धावा; 4×1), यांनी 24.3 षटकात 118 धावा केल्या. नंतर, सामायिता जिने, दादोजी कोंडदेव स्टेडियमवरील तिच्या मागच्या सामन्यात 93 धावा केल्या होत्या तिने पुन्हा एकदा तेवढ्याच धावा ठोकल्या आणि छेत्रीसोबत हात मिळवणी करून दुसऱ्या विकेटसाठी आणखी 94 धावांची भागीदारी केली. दुसरीकडे, मिझोरामच्या गोलंदाजांची काही खास दिवस नव्हता. संध्या राय (3/52) सोडून बाकी कोणी लक्षणीय प्रदर्शन करू शकले नाही.
ठाणेवैभवाशी संवाद साधताना समायताने सांगितले, “खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती, पण सुरुवातीला थोडे अवघड होते. आज, मी नाबाद खेळी खेळायचे ठरवले होते आणि मला आनंद आहे की तसे झाले. मी माझ्या डावात खेळलेल्या दोन पुल शॉट्सने मला खूप आत्मविश्वास दिला. मिझोरामने चांगली गोलंदाजी केली. तथापि, अधूनमधून मला लूज डिलिव्हरी मिळाल्या ज्याच्यावर मी आक्रमण केले.”
त्याचप्रमाणे, क्रिकेटबरोबर राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळलेली प्रीतिका म्हणाली, “मला सर्व 50 षटके फलंदाजी करायची होती. मला माझी विकेट फेकायची नव्हती. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज मी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये माझे पहिले अर्धशतक झळकावले आणि या स्पर्धेत माझा पहिला षटकार देखील मारला. आमच्या सलामीच्या भागीदारीदरम्यान आम्ही सतत एकमेकांशी बोलत होतो. आम्ही किमान पहिले 20 षटके फलंदाजी करून एक चांगला पाया उभा करण्याचा निर्धार केला होता ज्याणेंकरून येणाऱ्या फलंदाजांना आल्यापासून मोठे शॉट्स खेळता येऊ शकले असते. आमचा शेवटचा सामना विसरता येण्याजोगा होता आणि या सामन्यात आम्हाला स्वतःला सिद्ध करायचे होते. कोणत्याही संघाने आम्हाला हलक्यात घेऊ नये हे आमचे उद्दिष्ट आहे.”
मिझोरामला त्यांच्यापुढे कठीण काम होते, कारण त्यांना विजयासाठी 282 धावांची गरज होती. ते त्यांच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये (6 वि. गोवा आणि 45 वि. ओडिशा) स्वस्तात बाद झाले. परंतु सिक्कीमविरुद्ध खेळताना त्यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांनी 49.3 षटकांत 184 धावा केल्या. यष्टिरक्षक-फलंदाज पीसी व्हॅन संग झुआलीने 142 चेंडूत 84 धावा केल्या, या डावात 13 चौकारांचा समावेश होता. तथापि, या उजव्या हाताच्या फलंदाजाला सक्षम सहकारी मिळाले नाहीत कारण सिक्कीमचे गोलंदाज त्यांच्यावर भारी पडले. लीझा (3/34) आणि सबिता (3/21) या वेगवान जोडीने मिझोरामच्या फलंदाजीची कंबर मोडली.
ठाणेवैभवाशी बातचीत करताना झुआली म्हणाली, “गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. या सामन्यात मी चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केला होता. मी काही वेगळे केले नसले तरी आज माझ्यात अधिक आत्मविश्वास होता. मला इच्छेनुसार चौकार मारता आले. या कामगिरीनंतर मला विश्वास आहे की मी या स्पर्धेत शतक झळकावू शकेन.” ती पुढे म्हणाली, “ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आम्ही एक संघ म्हणून दोन आठवडे सराव केला. आमच्याकडे मिझोराममध्ये जास्त क्रिकेट मैदाने नसल्यामुळे आम्ही इनडोअर प्रॅक्टिस केली. आमच्या संघातील बहुतेक खेळाडू फुटबॉलही खेळतात, ज्यामुळे ते फिट राहतात.” तसेच सिक्कीमने या स्पर्धे पूर्वी ओंटेक्स मैदानावर मुंबईच्या लोकल महिला क्रिकेट खेळाडूंबरोबर सामने खेळून सराव केला.
सध्या सुरु असलेल्या वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफटीमध्ये सिक्कीम आणि मिझोराम संघांनी प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये सिक्कीमने एक जिंकला आहे आणि मिझोराम अजूनही आपल्या पहिल्या यशाच्या शोधात आहे.