कळव्यात आव्हाड समर्थकांकडून श्रीरामाचा जयघोष

ठाणे : एकीकडे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केले असले तरी दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघातील कळवा परिसरात त्यांच्या समर्थकांनी आठ हजार भगव्या झेंड्यांचे वाटप करून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसर श्रीराममय केल्याचे दिसत आहे.

अयोध्या येथे २२ जानेवारीला श्रीराम मंदीर उद्घाटन आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि त्यांच्या पक्षाशी संबंधीत संस्था यांनी ठाण्यात विविध कार्यक्रम आयोजित केले असून शहर श्रीराममय केले आहे. अशावेळी प्रभु श्रीराम हे मांसाहारी असल्याचे विधान करून राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाद ओढावून घेतला होता. हा वाद काहीसा शमल्याचे चित्र असतानाच, आता आव्हाड समर्थकांनी रामाचा जप सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आव्हाड यांच्या समर्थकांनी कळवा परिसर भगवामय करत राम घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थकांनी आठ हजार भगव्या झेंड्याचे वाटप केलेले आहे. या झेंड्यांवर रामाचे आणि मंदीराचे चित्र आहे. हे झेंडे परिसरातील रस्ते, इमारतींवर लावण्यात आलेले आहेत. ‘मन और घर मे जय श्रीराम’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आव्हाड समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. यानिमित्ताने आव्हाड समर्थकांना जनतेच्या मनातील ‘राम’ कळला असून यातूनच त्यांनी हा उपक्रम राबविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

प्रभु श्रीराम हे आमच्याही मना-मनात आहेत. प्रभु श्रीराम हे प्रत्येक हिंदूंचा अभिमान असून ते प्रत्येकाच्या मना-मनात आहेत. त्यामुळेच आम्ही झेंड्यांमार्फत राम घराघरापर्यंत पोहचविण्याचा छोटा प्रयत्न केला आहे. कळवा परिसरात आठ हजार भगवे झेंडे लावलेले असून हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नाहीत. या झेंड्यांवर राम आणि मंदिराचे चित्र आहे. ‘मन और घर मे जय श्रीराम’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविल्याचे आहे, असे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) माजी युवक अध्यक्ष मंदार केणी यांनी सांगितले.