भाईंदर: विरारमध्ये काही अज्ञात इसमांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर गोळीबार केला. गोळीबार करून अज्ञात व्यक्ती घटनास्थळाहून फरार झाले. गोळीबार नेमका का करण्यात आला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या अंधारात झालेल्या गोळीबारामुळे विरारचा बिहार होत असल्याची चर्चा सुरू आहे.
विरार पूर्व गोपचर पाडा येथील आशियाना अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील सदनिकेमध्ये वास्तव्य करणाऱ्या मोबिन शेख यांच्या घरावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यानंतर ते तेथून फरार झाले आहेत. हा गोळीबार आपापसातील वादातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पहाटे 3 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी मदतीच्या बहाण्याने मोबिन यांचे दार वाजविले. पण घरातून व्यक्ती बाहेर न आल्याने अज्ञातांनी या घराच्या खिडकीवर बेछूट गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार पहाटेच्या सुमारास झाला. गोळीबार झाला तेव्हा महिला आणि त्यांचा मुलगा घरामध्येच झोपले होते. घरात झोपलेले असताना बाहेरून अचानक गोळीबार झाला. गोळीबारात या घरातील खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून गोळीबार करणाऱ्यांचा तपास सुरू असल्याचे सांगितले.