केदार दिघे, नजीब मुल्ला देखील अर्ज भरणार
ठाणे : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्याच दिवशी त्यांचे प्रतिस्पर्धी केदार दिघे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
विधानसभा निवडणुकीकरिता २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २८ तारखेला त्यांचा उमेदवारी अर्ज वागळे इस्टेट येथिल आयटीआय येथिल निवडणूक कार्यालयात सकाळी ११वाजता दाखल करणार आहेत. त्याकरिता शिवसैनिकांना सकाळी मॉडेला चेक नाका येथिल दत्त मंदिर येथे उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. या मतदार संघातून पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री श्री. शिंदे उतरले आहेत. मुख्यमंत्री पदावर असताना ते पहिल्यांदा अर्ज दाखल करणार असल्याने मोठे शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. वाजत-गाजत सर्व समाजाच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन मोठी मिरवणूक काढून त्यांचा अर्ज भरला जाणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी होणार असल्याचे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी सांगितले आहे.
दरम्यान याच मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे शहर प्रमुख केदार दिघे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते देखील शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. माजी खासदार राजन विचारे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसैनिक मोठया प्रमाणावर उपस्थिती राहणार आहेत.
कळवा-मुंब्रा मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला हे देखील दुसरा उमेदवारी अर्ज वाजत-गाजत मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करून उद्या भरणार आहेत. या मतदार संघातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक राहिल्याने दोन दिवस ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.