किरीट सोमय्याविरोधात शिवसेनेची जिल्हाभर आंदोलने; अटकेची मागणी

ठाणे: किरीट सोमय्या यांनी आरोप करत शिवसेना नेत्यांना अडचणीत आणल्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार संजय राऊत यांनी विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी जनतेकडून गोळा केलेले कोट्यवधी रुपये राजभवनात न भरल्याचा आरोप करत सोमय्या यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज ठाणे जिल्ह्यात शिवसेनेने आंदोलने करीत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

ठाणे शहरात खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला, पोलिसांच्या विनंतीला मान हा मोर्चाही आवरता घेण्यात आला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकास आघाडी विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली असून त्यांच्यामुळे शिवसेनेचे अनेक बडे नेते अडचणीत आले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शिवसेनेचे माजी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तर त्यांनी गंभीर आरोप करत शिवसेनेलाच अडचणीत आणले आहे. त्यावर कुरघोडी करण्यासाठी संजय राऊत यांनी विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी किरीट सोमय्या यांनी जनतेकडून कोट्यवधी रुपये गोळा करून परस्पर त्याचा अपहार केल्याचा आरोप केला.

भारतीय नौदलाची शान असलेल्या विक्रांत युद्धनौकेच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करून तो परस्पर लाटल्याचा गंभीर आरोप करत गुरुवारी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी टेंभी नाका येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जोपर्यंत सोमय्या यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा सेनेच्या वतीने खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिला. यावेळी किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली.

सोमय्या यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे यासाठी जिल्ह्याधिकारी यांना निवेदन विचारे देणार होते. परंतु कोर्ट परिसर असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शिवसेनेने पोलिसांच्या विनंतीला मान देत आंदोलन थांबवले. महागाई वाढली आहे, पेट्रोल, डिझेंलचे दर वाढलेले आहेत. त्याकडे केंद्राचे दुर्लक्ष होत आहे. ते कमी कसे होतील, याकडे लक्ष न देता, केवळ बिनबुडाचे आरोप करतात. परंतु आता आरोप करणारेच आरोपीच्या पिंजऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी खा. विचारे यांनी केली.

अंबरनाथला शिवसेनेचे आंदोलन

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष विजय पवार, युवा सेनेचे कोकण विभागीय सचिव निखिल वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. माजी नगरसेवक पद्माकर दिघे, रवी पाटील त्याचप्रमाणे किशोर मोरे, संभाजी कळमकर, संजय गावडे,  अरविंद मालुसरे, शैलेश भोईर, दीपक पवार, चंदा गान यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याण पूर्वेत जोडे मारो आंदोलन

कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी शहर शाखेसमोर मुख्य रस्तावर शिवसैनिकांनी आक्रमक होत किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ ठिय्या मांडण्यात आला. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे, प्रशांत काळे, कैलास शिंदे, पुरषोत्तम चव्हाण, महेश गायकवाड, युवती सेना जिल्हा समन्वयक तेजस्वी पाटील आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

उल्हासनगरात शिवसैनिकांची धरपकड

सोमय्या यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आज उल्हासनगरातील शिवसैनिकांनी महामार्गावर आंदोलन केले. पोलिसांनी पदाधिकाऱ्यांची धरपकड करून त्यांची सुटका केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक धनंजय बोडारे,राजेंद्रसिंह भुल्लर, युवासेनेचे कल्याण उपजिल्हा अधिकारी ऍड.केतन नलावडे, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, सुशील पवार, महिला आघाडीच्या मनीषा भानुशाली, युवतीसेना आदी शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलन कर्त्यांची मध्यवर्ती पोलिसांनी धरपकड करून त्यांची पोलीस ठाण्यातून सुटका केली.