शिवसेना-राष्ट्रवादीचे उमेदवार सदाशिव पाटील उप नगराध्यक्षपदी

अंबरनाथ विकास आघाडीचे प्रदीप पाटील पराभूत

अंबरनाथ: अंबरनाथच्या उप नगराध्यक्षपदाच्या झालेल्या चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अखेर शिवसेनेने भाजपावर बाजी मारली असून शिवसेना महायुती आघाडीचे उमेदवार सदाशिव पाटील यांची उप नगराध्यक्षपदी निवड झाली. पाटील यांनी भाजपा आणि काँग्रेसच्या अंबरनाथ विकास आघाडीचे उमेदवार प्रदीप पाटील यांचा पराभव केला.

अंबरनाथच्या उप नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी पालिका इमारतीमध्ये अभूतपूर्व घोषणाबाजी आणि आरोप प्रत्यारोप यामुळे निवडणुकीत गोंधळाच्या आणि तणावाच्या वातावरणात सुरुवात झाली. नगरपालिकेत भाजपच्या नगराध्यक्षपदी तेजश्री करंजुले यांची थेट नगराध्यक्षपदी निवड झाली होती. 59 सदस्य असलेल्या पालिकेत भाजपा 14, शिवसेनेचे 27, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादीचे चार आणि एक अपक्ष सदस्य निवडून आले होते. उप नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठांनी निवडून आलेल्या 12 सदस्यांना पक्षातून निलंबित केले होते. यानंतर भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली होती. या आधारे 32 नगरसेवकांच्या आधारे नगराध्यक्ष पदावर दावा सांगितला आणि काँग्रेसच्या प्रदीप पाटील यांना उप नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली होती. याचवेळी शिवसेनेने राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना आपल्याकडे खेचून राष्ट्रवादीचे नगरसेवक सदाशिव पाटील यांना उप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. याही परिस्थितीत भाजपचा व्हिप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना लागू होईल असे जाहीर केले यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. आज दुपारी नगराध्यक्षा करंजुले यांच्या अध्यक्षतेखाली उप नगराध्यक्ष पदाची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली.

भाजपाचे गटनेते अभिजित करंजुले आणि प्रदीप पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या भूमिकेवरून आक्षेप घेत त्यांनी सत्ताधारी गटाच्या बाजूला बसावे, त्यांची अंबरनाथ विकास आघाडीत नोंद झाल्याचे सांगितले. यावरून शिवसेना सदस्य देखील आक्रमक झाले, आजच्या विषय पत्रिकेवर उप नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम असल्याने कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यवाही सुरू करण्याचा आग्रह शिवसेना गटनेते रविंद्र करंजुले यांच्यासह सर्व सदस्यांनी मुद्दा उचलून धरला, सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला.

यावेळी नगराध्यक्षांनी भाजपा गटनेते करंजुले यांना त्यांच्या गटाची बाजू मांडण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा शिवसेना महायुती आघाडी आक्रमक झाली. बराच काळ झालेल्या चर्चेअंती भाजपा आणि काँग्रेस अशा अंबरनाथ विकास आघाडीच्या सदस्यांना उप नगराध्यक्ष पदासाठी मतदान करण्यासाठी सांगण्यात आले. त्यावेळी अंबरनाथ विकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला. त्यावेळी प्रदीप पाटील यांना 28 मते मिळाली. यानंतर अंबरनाथ शिवसेना महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यांना अपेक्षेनुसार 32 मते मिळाली. नगरपालिकेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीच्या प्रशस्त सभागृहात प्रथमच झालेल्या उप नगराध्यक्ष पदाची निवडणूक गोंधळाच्या वातावरणात पार पडली.

उप नगराध्यक्षपदी सदाशिव पाटील यांची निवड झाल्यानंतर नगराध्यक्षा करंजुले, प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड नंतर प्रदीप पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी उप नगराध्यक्ष पाटील यांचे अभिनंदन केले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर आदींनी उप नगराध्यक्ष पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळूनही शिवसेनेला बाजूला ठेऊन काँग्रेसला घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य वाटले. याबाबत भाजपाशी प्रदेश आणि स्थानिक पातळीवर चर्चा करण्यात आली होती. तरीही युतीबाबत निर्णय होऊ शकला नाही, असे असले तरी अंबरनाथच्या राजकीय घडामोडींचा परिणाम राज्यात महायुतीवर होणार नाही, असे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

आज सभागृहात राष्ट्रवादीच्या बाबतचे इतिवृत्त आणि हात उंचावून केलेल्या मतदानाच्या वेळी केलेल्या स्वाक्षऱ्या आदींची कागदोपत्री माहिती घेऊन त्यानंतर राष्ट्रवादीच्या पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अंबरनाथ विकास आघाडीचे नगरसेवक प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केले. सदाशिव पाटील यांची उप नगराध्यक्षपदी निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.