ठाणे : ठाणे महापालिकेतील शिवसेना गटाच्या ७५ नगरसेवकांनी आज गट स्थापन केला असून पवन कदम यांच्याकडे गट नेतेपदाची जबाबदारी पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे. तर एकमेव अपक्ष नगरसेवक प्रमिला केणी या मात्र स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे समजते.
महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाला ७५ जागी यश मिळाले होते. या सर्व जणांचा गट करण्याची प्रक्रिया कोकण भवन येथे केली जात असून गट झाल्यानंतर ज्या पक्षाला पाठिंबा दिला आहे त्याचा व्हीप नगरसेवकाला बंधनकारक असतो. पुढील महिन्यात ठाणे महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, त्याचबरोबर विशेष समिती सभापती यांची निवडणूक होणार आहे. त्याकरिता गट स्थापन करणे आवश्यक असते. त्यामुळे आज ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला असून प्रभाग क्र २२मधून विजयी झालेले पवन कदम यांची गट नेते पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या सहीने पक्षाचे व्हीप काढले जाणार आहेत.
दरम्यान कळवा येथिल प्रभाग २३मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या प्रमिला केणी यांनी मात्र स्वतंत्र गट निर्माण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.