* शिवसेनेने मांडला युतीचा प्रस्ताव
* युतीसाठी भाजपा सकारात्मक असल्याची चर्चा
अंबरनाथ: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजपा यांच्यात युती होणार असून शिवसेनेने युतीबाबतचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला असून भाजपाने देखील प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाने युती न झाल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढली होती. या निवडणुकीनंतर देखील युती झाली नाही. मागील पाच महिन्यांपासून युती न झाल्याने त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होताना दिसत आहे. त्यामुळे शहर विकासासाठी दोन्ही पक्षांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे. येत्या काही दिवसांत युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक अब्दुल शेख आणि कुणाल भोईर तसेच नगरसेविका रोहिणी भोईर आदींनी आज पत्रकार परिषदेत युतीसंदर्भात भाष्य केले असून या मैत्रीबाबत भाजपाने देखील सकारात्मक भूमिका मांडली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेची डिसेंबर 2025 रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती न झाल्याने नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. तर या निवडणुकीत शिवसेनेचे 27, भाजपाचे 14, काँग्रेस 12, राष्ट्रवादी चार आणि अपक्ष दोन असे एकूण 59 नगरसेवक निवडून आले. मात्र सत्ता समीकरण जुळवताना काँग्रेसचे नगरसेवक भाजपामध्ये विलीन झाले. तर राष्ट्रवादीचे चार नगरसेवक तसेच एका अपक्ष नगरसेविकेने पाठिंब्यामुळे भाजपाचे संख्याबळ 31 इतके झाल्याने सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेनेने विरोधात बसण्याची मानसिकता तयार केली होती. मात्र अचानक राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी भाजपाची साथ सोडत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे पुन्हा पालिकेतील सत्ता समीकरण बदलले आणि शिवसेना सत्ता केंद्र बनली. मात्र संख्याबळाच्या मुद्द्यावर भाजपाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने हा निर्णय जिल्हाधिकारी यांनी द्यावा असे आदेश दिले. हा निर्णय देखील शिवसेनेच्या बाजूने लागल्याने शिवसेनेकडे 32 इतके संख्याबळ झाले. मात्र शिवसेना- भाजपातील या वादाचा परिणाम शहर विकासावर होत असल्याचे लक्षात आल्याने शिवसेनेने मोठ्या भावाची भूमिका बजावत महायुतीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येत्या काही दिवसात युती ची अधिकृत घोषणा होण्याची चिन्हे आहेत.
नगरपालिका निवडणुकीतील मतभेद विसरून शहर विकासासाठी युती करण्याची माजी उप नगराध्यक्ष तसेच नगरसेवक अब्दुल शेख यांनी भूमिका मांडली. भाजपने युतीच्या माध्यमातून शहर विकासासाठी कामाला सुरुवात करावी. शिवसेना सकारात्मक भूमिकेत आहे, असे ते म्हणाले.
विकास कामांत शिवसेना अडथळा निर्माण करते, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभा सभा बरखास्त न करता स्थगित केल्याचे नगरसेविका रोहिणी भोईर यांनी सांगितले. शिवसेनेला विश्वासात घेतले नाल्याची खंत व्यक्त करत शहर विकासासाठी शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी यांची महायुती होण्याची आवश्यकता नगरसेवक कुणाल भोईर यांनी बोलून दाखवली.
शिवसेनेच्या महायुतीच्या प्रस्तावाला भाजपाचे स्थानिक नेते गुलाबराव करंजुले-पाटील यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला व शहर विकासाच्या मुद्यावर एकत्र येण्यासाठी लवकरच वरिष्ठांशी चर्चा करून युतीची घोषणा करू, असे त्यांनी सांगितले.