भाजपच्या विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे इच्छुक

ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत एकीकडे शिवसेनेबरोबर युती करण्यास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विरोध करत असताना दुसरीकडे मात्र भाजपचे विद्यमान नगरसेवक असलेल्या प्रभागात शिवसेनेच्या सर्वाधिक इच्छुकांनी सेनेकडून फॉर्म घेतल्याने महायुतीच्या नेत्यांचा कस लागणार आहे.

महापालिकेची निवडणूक पुढील महिन्यात होणार असून या निवडणुकीकरिता शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांची जागा वाटपाकरिता बैठक सुरु आहे तर दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सेनेबरोबर युती करण्यास कडाडून विरोध केला आहे तर शिवसेनेने त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्जाचे वाटप कालपासून सुरु केले आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे एक हजारहून जास्त उमेदवारांनी उमेदवारी मागितली असून त्यामध्ये सर्वाधिक इच्छुकांची संख्या ही विद्यमान भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागात आहे. त्यामुळे जागावाटप बोलणी करताना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे.

याबाबत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि सेनेकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या फार मोठी आहे. भाजपाचे नगरसेवक असलेल्या प्रभागातच नाही तर संपूर्ण महापालिका हद्दीत सेनेला प्रतिसाद आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढविण्याची इच्छा असते. भाजपाच्या प्रभागात देखील आमच्या पक्षाचे काम असून त्यांना निवडून येण्याचा विश्वास आहे, परंतु आमचा पक्ष हा शिस्तीचा पक्ष असून आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील त्याचे पालन करतील. युतीधर्म आम्ही पाळणारे आहोत, असे खा. श्री. म्हस्के यांनी स्पष्ट केले.
महापालिकेत १३१ नगरसेवकांपैकी शिवसेनेकडे सध्या ८३ माजी नगरसेवक आहेत तर भाजपाकडे २४ नगरसेवक आहेत.