भाजपा संधीच्या शोधात
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेचे महापौरपद यंदा इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्याने उल्हासनगरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
बुधवारी ४० नगरसेवकांचा गट स्थापन करुन नोंदणी केलेल्या शिवसेनेत महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून शिवसेनेकडे महापौर पदासाठी उच्चशिक्षित नगरसेविका इंदिरा पाटील, जयश्री चौधरी, ज्योत्स्ना जाधव, साक्षी सुर्वे, प्रदीप गोडसे असे उमेदवार आहेत तर कलानी गटाकडे कलानीचे खास समजले जाणाऱ्या अश्विनी निकम, दिलीप जग्यासी, विकी सिंग लबाना आणि डिंपल कुमारी ठाकूर हे सर्व ओबीसी आरक्षणातून निवडून आलेले नगरसेवक महापौर पदासाठी इच्छुक आहेत.
महापालिका महापौरपदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे आणि भाजपातील ओबीसी नगरसेवकांमध्ये कमालाची चुरस निर्माण झाली आहे.
शिवसेनेने वंचित आघाडी, अपक्ष आणि साई पक्षाच्या पाठिंब्याने ४चा मॅजिक आकडा गाठल्याने भाजपा आणि शिवसेनेत महायुतीची शक्यता कमी वाटत आहे. दुसरीकडे भाजपाचे दिग्गज उमेदवार धनंजय बोडारे बंधू यांच्या पूर्ण पॅनलचा धुव्वा उडविणाऱ्या शिवसेनेच्या इंदिरा पाटील यांचे नाव शिवसेनेत महापौर पदासाठी सर्वाधिक पुढे आहे.
शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी हे सतत नगरसेवकपदी निवडून येत असून त्यांची पक्ष संघटनेवर पकड आहे. त्यांच्या पत्नी व माजी महापौर राजेश्री चौधरी याही महापौर पदाच्या दावेदार आहेत.
तर टीम ओमी कलानीच्या अश्विनी निकम, डिंपल ठाकूर,, दिलीप जग्यासी यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे एनवेळी कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर पदाच्या स्पर्धेत असलेल्या बहुतांश महिला नगरसेवकांच्या पतीवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने, त्यांची महापौर पदी वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे.
भाजपमधील ओबीसी नगरसेवक
भावना ओवळेकर, सुरेखा आव्हाड, ज्योती पाटील, रवी जग्यासी, कैलास म्हात्रे, नैन्सी उदासी, विपूल मयेकर, ललिता पाटील, प्रीती माखीजा आदी नगरसेवक आहेत.
शिंदे सेनेचे नवनिर्वाचित गटनेते व उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांची भूमिका महापौर पदाच्या निवडीत महत्वाची ठरणार आहे. त्यांनी ज्या नावाचा आग्रह धरला, त्याच नावाचा विचार महापौर पदासाठी पक्षश्रेष्ठी करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महापौर आमचाच होणार; भाजपचा दावा
महापालिकेच्या ७८ जागांपैकी भाजपचे सर्वाधिक ३७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना सत्तेसाठी तीन नगरसेवकांची गरज आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या अंजली साळवे यांनी तटस्थ राहण्याचे संकेत दिले आहेत. शिंदे सेनेने सत्तेची ४० ची मॅजिक फिगर गाठल्याने महापौर पद शिंदे सेनेकडे जाणार आहे. मग भाजपा बाकीचे तीन नगरसेवक कसे व कुठून आणणार हा प्रश्न आहे. सेना-भाजपा महायुती झाली आणि वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला तरच भाजपाला महापौरपद मिळू शकते परंतु अशी शक्यता फारच कमी दिसत आहे. दरम्यान महायुतीचा महापौर भाजपाचाच होणार असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी केला आहे.