अंबरनाथला उद्यापासून शिवमंदिर आर्ट फेस्टिवल

मैथिली ठाकूर, साधना सरगम, अभिजीत भट्टाचार्य, कैलाश खेर आणि सोनू निगम लावणार उपस्थिती

अंबरनाथ : यंदाही अंबरनाथकरांना चार दिवस शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून कलेचा मंगल सोहळा’ अनुभवता येणार आहे. ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’ यंदा २९ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत रंगणार आहे.

प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात गेल्या सात वर्षांपासून होणाऱ्या महोत्सवात यंदा प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर, साधना सरगम, गायक अभिजीत भट्टाचार्य, कैलाश खेर आणि सोनू निगम आपली कला सादर करणार आहेत. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हा आर्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे.

अंबरनाथ शहराला प्राचीन शिवमंदिराच्या रूपाने ऐतिहासिक वारसा लाभला आहे. स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमूना म्हणून या प्राचीन शिवमंदिराकडे पाहिले जाते. या शिवमंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा आणि सोबतच जागतिक पातळीवर शिवमंदिराची ओळख निर्माण व्हावी, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल साजरा केला जातो. जागतिक दर्जाचे कलाकार या फेस्टिव्हलमध्ये येऊन त्यांची कला सादर सादर करतात. या फेस्टिव्हलमुळे अंबरनाथकरांना दरवर्षी सांस्कृतिक मेजवानी मिळते.

यंदा २९ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरच्या गाण्याच्या मैफिलीने महोत्सवाची सुरुवात होईल, १ मार्च रोजी गायक अभिजित भट्टाचार्य आणि गायिका साधना सरगम आपली कला सादर करणार असून २ मार्च रोजी प्रसिद्ध गायक कैलाश खेर कला सादर करणार आहेत. तर ३ मार्च रोजी अखेरच्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम अंबरनाथकरांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणार आहे.

यासोबतच यंदा शशिकांत धोत्रे आर्ट गॅलरी, लाईव्ह पोर्ट्रेट, लाईव्ह पेंटिंग, लाईव्ह शिल्पकला, मेन स्टेज, लोकल स्टेज या माध्यमातून कला सादरीकरण, विविध कलाकृती आणि इन्स्टॉलेशन्स पाहण्याची संधी अंबरनाथकरांना मिळणार आहे.

चित्रकार नानासाहेब येवले, मनोज देशमुख, विवेक वाडकर, चंद्रशेखर जाधव, हेमंत मागर्डे, नित्यम सिंघा रॉय, श्रीकांत कदम, शार्दूल कदम, अद्वैत नादवडेकर, श्रीकांत जाधव यांच्या कलाकृती प्रदर्शनात असणार असून हे सर्व कलाकार कला लाईव्ह सादर करणार आहेत. मागील वर्षीपासून आर्ट फेस्टिव्हल चार दिवसांचा करण्यात आला असून त्यामुळे अंबरनाथकरांना यंदाही ४ दिवस ‘कलेचा मंगल सोहळा!’ अनुभवता येणार आहे.

परिसर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन

शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण करून कायापालट करण्यासाठी राज्य शासनाने १३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्राचीन शिवमंदिर ही पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील संरक्षित वास्तू असल्याने या निधीतून मंदिर वगळता आजूबाजूच्या क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. यामध्ये प्रवेशद्वार, सर्कल आणि नंदी, पार्किंग प्लाझा, प्रदर्शन केंद्र, अँपीथिएटर, अंतर्गत दगडी रस्ते, भक्तनिवास, संरक्षक भिंत, घाट, खेळाचे मैदान आणि स्वच्छतागृहे अशी कामे केली जाणार आहेत. या कामांचे भूमिपूजन ३ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पतंजली योगपीठाचे योगगुरू बाबा रामदेव, अयोध्येचे महंत गोविंदगिरी महाराज हे मान्यवरही उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.