* लोकमान्य नगर शाखा ताब्यात घेतल्याची ठाकरे गटाची तक्रार
* रविवारी मध्यरात्री कार्यकर्त्यांत ताणाताणी
ठाणे: ठाण्यात पुन्हा एकदा शिंदे गटाने शाखा बळकावल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर येथील शिवसेनेची 45 वर्षांहून अधिक जुनी असलेली शाखा ताब्यात घेण्यासाठी रविवारी रात्री शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. याबाबत ठाकरे गटाच्या वतीने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
आज पोलीस आयुक्त जयजित सिंह यांना ठाकरे गटाने पत्र देखिल दिले आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी शाखा आणि इतर स्थावर गोष्टी ताब्यात घेणार नसल्याचे सांगत असताना अशा प्रकारे शाखा बळकावणे चुकीचे असल्याचे खासदार राजन विचारे यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा लोकमान्य नगर शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन्हीकडील कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. आता ठाकरे गटाने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले असून उलट ठाकरे गटाने आमच्या पक्षाच्या नावाचा आणि चिन्हाचा गैरवापर केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
दरम्यान ज्या शाखेवरून वाद निर्माण झाला त्या शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असणारा बॅनर लावण्यात आला असून ठाकरे गटाचा आमच्या शाखेवर हक्क सांगण्याचा काहीही अधिकार नसल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.