कोकण पदवीधर संघावर शिंदे गटाचा दावा

ठाणे: कोकण पदवीधर मतदार संघावर शिवसेना शिंदे गट दावा करणार असून या गटाने देखिल निवडणुकीत सर्व शक्तिनीशी उतरण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपा बाजी मारतो कि शिंदे गट जागा मिळविण्यात यशस्वी होतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
पुढील वर्षी कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक होऊ घातली असून त्याकरिता पदवीधर मतदार याद्या तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. भाजपच्या विद्यमान आमदारांनी तिसऱ्यांदा ही निवडणूक जिंकण्यासाठी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यासाठी पदवीधर मतदारांच्या नावाची नोंद करण्याच्या मोहिमेत ते आघाडीवर आहेत. त्यांनाच पक्षश्रेष्ठी उमेदवारी देतील, असा त्यांना पूर्ण विश्वास आहे.
राज्यातील सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जागेकारिता शिंदे गट आक्रमक झाला आहे.
मागील निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपा रिंगणात उतरले होते. शिवसेनेचे संजय मोरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि भाजपचे ॲड. निरंजन डावखरे यांच्यात सामना झाला होता. त्यामध्ये श्री.डावखरे हे विजयी झाले होते. या निवडणुकीत शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजपाची महायुती आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांची आघाडी आहे
शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे, पूर्वेश सरनाईक, भाजपचे निरंजन डावखरे, ॲड. संदिप लेले, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हे महायुतीचे इच्छुक आहेत.
शिंदे गट निवडणूक लढवणार असून त्यांनी या जागेवर दावा केला आहे. त्यांनीही मोहीम सुरु करून मोठ्या प्रमाणात पदवीधरांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. ही जागा भाजपा लढणार असली तरी यावेळी ती आम्हाला पाहिजे, ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय या मतदार संघाची उमेदवारी दिली जाणार नाही. त्यामुळे ही जागा आमच्या पदरात पडेल, असा दावा शिंदे गटाच्या एका इच्छुक उमेदवाराने केला आहे.
ही जागा आमच्या ताब्यात आहे. गेली अनेक वर्ष भाजपचा उमेदवार विजयी होत आहे, त्यामुळे ही जागा भाजपाच लढवेल, असा विश्वास भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’जवळ व्यक्त केला.