शिंदे गट-भाजपला फटकारले, राहुल गांधींनाही खडसावले !

मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी

मालेगाव: तुमचा नेता म्हणजे भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सावरकरांच्या मुद्द्यावरुन खडसावले. आपण एकत्र असलो तरी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही राहुल गांधींना दिला. मालेगाव येथील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवसेनेने तुम्हाला जन्म दिला.. तुम्ही आईच्या कुशीवर वार केला. हिंमत असेल तर आज निवडणूक लावा. तुम्ही मोदींच्या नावाने लढा, मी बाळासाहेबांच्या नावाने लढतो, असा टोला ठाकरे यांनी शिंदेंना आणि भाजपला लगावला.
खेडमध्ये अतिविराट सभा झाली होती. आजची सभा आणखी अथांग पसरली आहे. आज आपले नाव, धनुष्यबाण चोरले आहे. माझ्या हातात काहीही नाही, तरिही इतकी गर्दी! ही सर्व पूर्वजांची पुण्याई आहे. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही. तुमच्या कष्टासाठी लढतोय. आता जिंकेपर्यंत लढायचेय. गद्दार आणि ढेकणाला चिरडायला तोफेची गरज नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
जगभरात कोरोनाचा संकट आले तेव्हा मुंबईतील धारावी आणि मालेगावमध्ये कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा काळजाचा ठोका चुकला होता. त्यावेळी तुम्ही सर्वांनी सहकार्य केले नसते, तर मालेगाव वाचले नसते. तुम्ही माझे ऐकले तुमचे धन्यवाद, असेही ठाकरे म्हणाले.
नाव चोरले, धनुष्यबाण चोरले, पण ही जीवाभावाची माणसे, प्रेम करणारी माणसे चोरू शकत नाहीत. प्रेम करणारी माणसे विकत घेता येत नाहीत. मुख्यमंत्रीपद येते आणि जाते, पण हे प्रेम कायम राहते. हे प्रेम गद्दारांच्या नशीबात नसते. कांद्याला भाव मिळाला नाही, असे तुम्ही म्हणतात. मी म्हणतो कांदाखरेदी झाली. एक कांदा 50 खोक्याला विकला गेला, असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
अस्मानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकटे आपल्या सरकारवेळी होती. पण आपल्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे हा निश्चय केला होता. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पहिले पाऊल उचलले होते. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन म्हणून देणार होतो. पण गद्दारी झाली अन् सरकार गेले. जे विकेल ते पिकेल ही योजना आणणार होतो. शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवे आहे. पुढील वर्षी काय पिकवावे, याचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना फक्त हमीभाव नव्हे तर हमखास भाव मिळाला पाहिजे, हा माझा उद्देश होता, असे ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना वाचता येत नाही का? भाषण बरे वाचता येते.मुख्यमंत्री महोदय, तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहात. केंद्रातील भाजप सरकारचे शेतकरी विरोधात धोरण आहे, त्याविरोधात तुम्ही आवाज उठवा. पण बकरे कधी आवाज उठवणार? तोंड उघडले तर काय बाहेर पडणार? यांच्याकडून अपेक्षा काय करणार? मुख्यमंत्री शेतकरी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शेतात दोन दोन हॅलिपॅड आहेत, असा टोला लगावला.
कृषी मंत्र्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे, ते काळोखात जाऊन अवकाळीची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान कृषीमंत्री काळोखात करतात. महिलांना शिव्या देतात. सुप्रिया सुळे यांना त्यांनी शिवीगाळ केली. तरीही मंत्री म्हणून निर्लज्जसारखे मांडीला मांडी लावून बसतात, हे त्यांचे हिंदुत्व आहे, असे ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगाचे गांडुळ झाले आहे. आयोगाच्या डोळ्यांत मोती बिंदू झाले नसेल तर खेड आणि मालेगांवची सभा बघावी. प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येनं दिली ती काय रद्दी होती काय? शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी केली नाही. गद्दारांना स्वत:च्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते. गद्दारांच्या हातामध्ये भगवा शोभत नाही. पक्ष चोरला, चिन्ह चोरले पण यांना शिवसैनिक चोरता आला नाही, पण गद्दारांचा शिक्का मात्र कपाळावर मारुन घेतला, असे ठाकरे म्हणाले.