माजिवडे उड्डाणपुलाखाली भटक्या श्वानांसाठी आश्रयगृह

ठाणे:ठाणे महापालिका प्रशासनाने मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडे उड्डाणपुलाखाली असलेल्या जागेत भटक्या श्वानांसाठी आश्रयगृह उभारणीचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबरच भटक्या श्वानांसाठी एक सुसज्ज नसबंदी केंद्र, बाह्यरुग्ण उपचार केंद्रही उभारण्यात येणार आहे.

या संबंधीचा सविस्तर प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार करून येत्या १८ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. वाढीव क्षमतेचे प्राणी जन्म नियंत्रण केंद्र आणि भटक्या श्वानांसाठी आश्रयगृह उभारणीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या पार्श्वभूमीवर या कामासाठी तातडीने निविदा काढून १५ दिवसांच्या आत काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य आणि केंद्र शासनाने दिले होते.

यानंतर पालिकेने भाईंदरपाडा येथे भटक्या श्वानांसाठी आश्रयगृह उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, भुखंड पुर्णपणे पालिकेला हस्तांतरीत करण्यात आलेला नाही. यामुळे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवाडा उड्डाण पुलाखाली वाहतूक पोलिस चौकीच्या पाठीमागे भटक्या श्वानांसाठी एक सुसज्ज नसबंदी केंद्र, बाह्य रुग्ण उपचार केंद्र आणि आश्रयगृह उभारणीचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते.

नसबंदी केंद्राची क्षमता वाढविणे आणि तात्पुरते आश्रयगृह उभारणीची गरज लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या धर्तीवर आयुक्त राव यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार, ७ कोटी ६९ लाख ८५ हजार ३१० रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा प्रस्ताव पालिकेने सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, या विषयाकडे सार्वजनिक आरोग्य, नागरिकांची सुरक्षितता तसेच प्राणी कल्याण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध आणि शास्त्रीय पद्धतीने लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. शहरातील सर्व भटक्या श्वानांना निवाऱ्या मध्ये ठेवणे व्यवहार्य, आर्थिकदृष्ट्या शक्य किंवा धोरणात्मक दृष्ट्या आवश्यक नसल्याचे अनुभवातून आणि तज्ञांच्या मतानुसार स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रमाद्वारे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण हीच दीर्घकालीन प्रभावी उपाययोजना मान्य करण्यात आलेली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची एकूण संख्या अंदाजे ४० ते ५० हजार इतकी असून त्यापैकी सुमारे पन्नास टक्क्यांहून अधिक श्वानांचे निर्बीजीकरण झालेले आहे. उर्वरित श्वानांचे टप्प्याटप्याने निर्बीजीकरण करून पुढील तीन वर्षाच्या कालावधीत एकूण भटक्या श्वान संख्येपैकी किमान ऐशी ते पंच्याऐंशी टक्के निर्बीजीकरण साध्य करणे हे प्रमुख उद्दिष्ट राहील, असे पालिकेने प्रस्तावात म्हटले आहे.