मनसेचे अविनाश जाधव यांनी केले उद्घाटन
डोंबिवली: १५ दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आत एकता सावंत या मराठी तरूणीने शोरमा विक्रीची हातगाडी लावली होती. ही हातगाडी नियमबाह्यपणे लावली म्हणून पालिकेच्या पथकाने या हातगाडीवर कारवाई केली होती. मात्र मनसे तिच्या पाठीशी उभी राहिल्याने तिने पुन्हा हा स्टॉल सुरू केला आहे.
एकता सावंत या तरूणीने स्कायवाॅकखाली शोरमा विक्रीचा व्यवसाय भाड्याने हातगाडी घेऊन सुरू केला होता. ही हातगाडी नियमबाह्यपणे दीडशे मीटरच्या आत लावली म्हणून पालिका पथकाने त्या हातगाडीवर कारवाई करून तेथे व्यवसाय करण्यास सावंत यांना विरोध केला. रेल्वे स्थानक भागात अनेक परप्रांतीय आणि इतर फेरीवाले दररोज व्यवसाय करतात. ते रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरची मर्यादा पाळत नाहीत. त्यांना दीडशे मीटरच्या आत व्यवसाय करण्यास परवानगी दिली जाते. मग माझ्यासारख्या मराठी तरूणीवर हा अन्याय का केला जात आहे, असा प्रश्न करत एकता सावंत यांनी एक चलतचित्र मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना २० दिवसांपूर्वी पाठविले होते. या चलतचित्राची दखल घेत राज ठाकरे यांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना डोंबिवली रेल्वे स्थानक भागात पाठवून पीडित सावंतला न्याय देण्यास. या तरूणीच्या हातगाडीवर पालिकेकडून कारवाई होता कामा नये यादृष्टीने प्रयत्न करण्यास सांगितले होते.
त्याप्रमाणे १५ दिवसांपूर्वी जाधव डोंबिवलीत येऊन सावंत यांच्याशी चर्चा करून तुम्हाला रेल्वे स्थानक भागात शोरमा विक्रीसाठी परवानगी दिली जाईल. पालिकेच्या पहिल्या महासभेत तुमचा विषय आपण मंजूर करून घेऊ, असे आश्वासन दिले होते. राजकीय हस्तक्षेपामुळे पालिकेने या प्रकरणापासून दूर राहणे पसंत केले होते.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे एकता सावंत यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आत बुधवारी नवीकोरी हातगाडी लावली. तेथे दणक्यात शोरमा विक्री व्यवसाय सुरू केला. या खाद्यान्न उपक्रमाचे उदघाटन नेते जाधव यांच्या हस्ते पार पडले. शहरप्रमुख राहुल कामत यावेळी उपस्थित होते.