नवी मुंबई: आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस असून आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली, संविधान दिले. या संविधानाचा सन्मान संपूर्ण देशात केला जातो, असे खासदार शरद पवार यांनी नवी मुंबईत सांगितले. भर पावसात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन नेरूळ येथे केले होते. त्यावेळी पवार यांनी भर पावसात बॅटिंग केली. मात्र पवार यांच्या सभेला आलेल्या पावसामुळे २०१९ मधील साताऱ्यातील सभेच्या आठवणी ताज्या केल्या.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार म्हणाले की, निसर्गाची साथ असो वा नसो, परिस्थितीवर मात करून देशाच्या ऐक्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करणे हा विचार फुले, डॉ. आंबेडकर तसेच शाहू महाराजांनी आपल्या सगळ्यात रुजवला आहे. आणि त्याच भावनेने आपण एकत्रित आलो. त्यामुळे आज अनेक महिलांनी त्यांच्या संघर्षाने या ठिकाणी स्टॉल्स उभे केले .मात्र अतिवृष्टीमुळे त्यांची निराशा झाली. मात्र निराशा ही आपल्यात कधीच येता कामा नये. या निराशेवर मात करून संघर्ष करून हाच कार्यक्रम पुन्हा राबवण्याचा निर्धार करू असा सल्ला यावेळी पवार यांनी उपस्थित महिलांना देत केलेल्या आयोजनाचे कौतुक करून महिलांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार नवी मुंबई शहरात येत असल्याने राष्ट्रवादी पक्षात उत्साह संचारला होता. त्यामुळे पवार या सभेत कोणाचा समाचार घेतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र अवकाळी आलेल्या पावसाने सभेवर पाणी फेरल्याने कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे, सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला अध्यक्ष सलुजा सुतार, मेहबुक शेख, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.