मार्केटमध्ये शरद पवार हेच एक नंबरचे नाणे

सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला

ठाणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाणे गेली सहा दशके खणखणीत वाजत आहे. विरोधकांना जेव्हा बातम्यांमध्ये प्रसिध्दी किंवा हेडलाईन मिळवायची असते तेव्हा ते शरद पवारांचे नाव घेतात. त्यामुळे शरद पवार मार्केटमधले एक नंबरचे नाणे असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगत अप्रत्यक्षरीत्या भाजपवर निशाणा साधला.

महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी आज ठाण्यात सत्यशोधक दिंडीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी आवर्जून हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आम्ही महिला शिकलो. तसेच छत्रपतींचे आदर्श तर आहेच पण शाहू-फुले-आंबेडकरांचे संस्कार आमच्यावर झाले. आज राज्यात-देशात आम्ही शिकून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी हाती घेऊन नेतृत्व करत असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.

महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस २०२३ मध्ये १५० वर्षे पूर्ण होत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले स्मृतीदिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला ठाणे शहरात सत्यशोधक दिंडी काढण्यात आली. यावेळी ज्येष्ठ कवयित्री डाॅ. प्रज्ञा पवार, जगदीश खैरालिया, अभय कांता यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (उबाठा), भा. रा. काँग्रेस, शेकाप, लाल निशाण पक्ष, रिपब्लिकन पक्ष (ऐक्यवादी), स्वराज इंडिया आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, शेकडो नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आणि केंद्र सरकारच्या पथकाने महाराष्ट्रात येऊन अतिवृष्टीचा सर्वे करावा, अशी मागणी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.