ठाण्यात आजपासून शक्तीचा जागर

ठाणे: आज घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सवासाठी ठाणेकर सज्ज झाले आहेत. ठाणे पोलिस आयुक्तालयात दुर्गा देवीच्या सुमारे ६०८ सार्वजनिक तर ३२५४ खाजगी उत्सवात देवींचे उद्या सोमवारी आगमन होत आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ७,५३२ घटांची प्रतिष्ठापनाही होणार आहे.

रविवारपासूनच मोठ्या उत्सवातील देवीच्या मूर्तींचे आगमन थाटामाटात झाले. मानाच्या आणि नवसाच्या देवींसह आगमन होणार्‍या दुर्गेश्वरीच्या स्वागत मिरवणुकीची जय्यत तयारी झाली आहे. ठाणे महापालिकेसह पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील महापालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रोत्सवात प्रचाराचा घट बसवण्यासाठी यावेळी मोठया प्रमाणात गरबा, दांडीयाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे नगरीसह जिल्हा आकर्षक रोषणाईने न्हाऊन निघाला आहे.

ठाण्यातील टेंभी नाका आणि कल्याणातील दुर्गाडी किल्ला येथील नवरात्रौत्सवासह गेल्या काही वर्षांपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर आदी शहरांमध्ये आदीशक्तीचा उत्सव दणक्यात साजरा होताना दिसत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार ठाणे पोलिस आयुक्तालयात यावेळी ३८६२ ठिकाणी दुर्गा देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापैकी ६०८ सार्वजनिक तर ३२५४ घरगुती आहेत. ठाणे परिमंडळात १०८ सार्वजनिक, २३१ घरगुती, भिवंडी परिमंडळात ९६ सार्वजनिक तर घरगुती १८६, कल्याणमध्ये सार्वजनिक १३६ तर घरगुती २६२४, उल्हासनगरात सार्वजनिक ११८ तर घरगुती ८९ तर वागळे येथे सार्वजनिक १५० आणि १२४ घरगुती मूर्तींचा समावेश आहे. यावेळी सुमारे ७५३२ घटांची स्थापना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी देवीची प्रतिमा ठेवून नऊ दिवस पुजन केले जाते. त्याभोवती फेर धरत गरबा खेळला जातो. अशा १३३ सार्वजनिक तर २८७ ठिकाणी देवीच्या प्रतिमेचे पुजन होणार आहे.