सुशिक्षित मतदारांची संतप्त प्रतिक्रिया
शहापूर: देशाच्या आर्थिक राजधानीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्याला पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने व त्याकडे लोकप्रिनिधींसह प्रशासनही गांभिर्याने लक्ष देत नसल्याने या मतदार संघातील तरुण सुशिक्षित मतदार कमालीचा नाराज दिसत असून हा वर्ग सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतांना दिसत आहे.
तालुक्यातून शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग मागील पाच वर्षांत देखील पूर्णत्वास गेला नाही आणि जो रस्ता झाला आहे तोही निकृष्ट दर्जाचा झाला असून संबंधित विभागाचे अधिकारी डोळे मिटून गप्प आहेत. बेसुमार जंगलतोड सुरु असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायची कोणाची हिम्मत नाही, दलालांच्या हस्तक्षेपामुळे भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नाही तसेच शेतक-यांना खते-बी-बियाणे,औषधे वेळेवर मिळत नाहीत आणि मिळाली तरी त्यांच्या अनधिकृत वाढत्या किंमतीवर कुणी आवाज उठवत नाहीत. शहापूर आगाराचे भिजत घोंगडे आजपर्यंत मार्गी लागले नसून जीव मुठीत घेऊन बसणाऱ्या एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करायला कोणाला वेळ नाही. विधवा महिला,अपंग बांधव यांच्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या अनेक रिक्त पदांचा अभाव असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. यावर देखील कोणाला जाब विचारला जात नाही.
शहापूर तालुक्यातून रोज हजारो चाकरमानी रेल्वेने प्रवास करतात.रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे चाकरमान्यांना लेटमार्कचा सामना करावा लागतो पर्यायी यामुळे काही तरुणांना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या. याबाबत रेल्वेप्रवाशी संघटना वारंवार दाद मागत असतात. मात्र त्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. भातसा डाव्या कालव्यामुळे अनेक शेतकरी सधन झाले असते किंबहुना बहुतांश शेतकऱ्यांच्या जमीनी विक्रीपासून वाचल्या असत्या. मात्र गेली अनेक वर्ष हा कालवा आजपावेतो होऊ शकत नाही ही शोकांतिका आहे.तालुक्यातील २७ गावे तसेच १२४ वाड्यांमधील जनतेला तीव्र टंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. या गाव-पाड्यांना दररोज टँकरने पाणी पुरवले जात आहे.तथापि टँकर पुरवल्याचे पुढाऱ्यांना भूषणावह वाटत असल्याची शोकांतिका सामाजिक कार्यकर्ते अनिल निचीते यांनी दैनिक ‘ठाणेवैभव’शी बोलताना व्यक्त केली.