अंबरनाथ: अंबरनाथमधील छाया उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता 100 बेड्सची व्यवस्था करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
अंबरनाथ नगरपालिकेकडे असणारे कै.डॉ.बी.जी.छाया रुग्णालयाला शासनाकडे हस्तांतरित करून त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. सध्या या रुग्णालयात ५० रूग्णशय्यांची सोय आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्या अस्तित्वात असलेले रुग्णालय अपुरे पडत असल्याने उपजिल्हा रुग्णालय १०० बेड मध्ये श्रेणीवर्धन करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता.
कै.डॉ.बी.जी.छाया उपजिल्हा रुग्णारेलयाचे ५० बेड वरुन १०० बेड मध्ये श्रेणीवर्धन करण्याकरिता मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. आता या छाया उपजिल्हा रुग्णालयात १०० बेड उपलब्ध होणार असून लवकरच याबाबतचा शासन निर्णय पारित होणार आहे. यामुळे अंबरनाथसह लगतच्या शहरातील व आदिवासी बांधवांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील का, असा विश्वास आमदार डॉ. किणीकर यांनी व्यक्त केला.
अंबरनाथ नगरपरीषदेने कै.बी.जी.छाया रुग्णालय .१२ ऑक्टोबर १९६९ रोजी स्थापन केले होते. या रुग्णालयाचा विस्तार करण्यात आला त्यावेळेस रुग्णालयात विविध पदावर १०४ कर्मचारी कार्यरत होते. परंतु अपुरा कर्मचारी वर्ग,तज्ञ डॉक्टर्स व इतर तांत्रिक मनुष्यबळा अभावी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नव्हती. अंबरनाथ शहर हे तालुक्याचे ठिकाण असुन शहराची लोकसंख्या सुमारे ३.५० लक्ष इतकी असून ७० टक्के वस्ती ही गरीब कामगारांची आहे. त्याचप्रमाणे शहराच्या आजुबाजुच्या परीसरात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण झाल्याने रुग्णालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे आदिवासी व गरीब गरजू नागरिकांना आरोग्य सुविधेपासून वंचित रहावे लागत होते. मागील काही वर्षापासून हे रुग्णालय चालवताना नगरपरिषदेला येणाऱ्या आर्थिक अडचणी, डॉक्टरांचा वानवा आणि अपुरी साधनसामुग्री यामुळे हे रुग्णालय जवळपास बंद पडलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, ते कर्जत पर्यंतच्या नागरिकांना उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात जावे लागत होते. हे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरीत करून या रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी देखील आमदार डॉ.किणीकर यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता.