कल्याणजवळील रायते येथील फार्म हाऊसवर गटारीचा राडा

गाणं लावण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

कल्याण: गटारी अमावस्यानिमित्त टिटवाळ्याजवळील रायते येथील आदित्य फार्म हाऊसवर पार्टी होती. या पार्टी दरम्यान गाणं लावण्यावरून दोन गटात वाद झाला. या वादातून एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्याच्या साथीदारांसह एका तरुणाला हातोडी, लाकडी दांडके व हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. या मारहाणीत करण जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात विकी भुल्लर, हैप्पी भुल्लर, सनि भुल्लर, मुकेश यादव, सचिन शेवाळे, मनि अण्णा, रमु, डॅनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमधील विकी भुल्लर हा उल्हासनगर येथे एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. घटनेला अनेक दिवस उलटले, मात्र अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गटारी अमावस्यानिमित्त सर्वत्र जोरदार दारू पार्ट्या झोडल्या जात होत्या. टिटवाळाजवळील रायते येथील आदित्य फार्म हाऊस येथे देखील गटारी अमावस्यानिमित्त करण जाधव हे आपल्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी गेले होते. रात्रीच्या सुमारास गाणे लावण्यावरून करण जाधव याचा दुसऱ्या गटासोबत वाद झाला. हा वाद पाहताच फार्म हाऊसच्या मालकाने दोन्ही गटाला फार्म हाऊसबाहेर जाण्यास सांगितले. याच दरम्यान विकी भुल्लर हा आपल्या साथीदारांसह या फार्म हाऊसवर आला. करण जाधव आणि विकी भुल्लर यांच्यात पुन्हा वाद झाला. विकी भुल्लर याने आपल्या साथीदारांसह करण जाधववर हल्ला चढवला.

विकी भुल्लर आणि त्याच्या साथीदारांनी करण जाधव याला हॉकी स्टिक, लाकडी दांडके, तसेच हातोड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत करण जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कल्याणमधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात विकी भुल्लर याच्यासह हैप्पी भुल्लर, सनि भुल्लर, मुकेश यादव, सचिन शेवाळे, मनि अण्णा, रमु, डॅनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत फिर्यादी जखमी करण जाधव याने पोलीस राजकीय दबावापोटी आरोपींना अटक करत नसल्याचा आरोप केला आहे. तर याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता त्यांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.