सांडपाण्याच्या वाहिन्या फुटल्या; वाघबीळमध्ये दारोदारी गटारे

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचा संताप

ठाणे: स्मार्ट सिटी म्हणून टेम्भा मिरवणाऱ्या ठाणे पालिकेच्या हद्दीतील वाघबीळ वासियांच्या दारात गटारे वाहू लागली आहेत. सांडपाण्याच्या वाहिन्या जागोजागी फुटल्या असल्याने गावात जाणाऱ्या ग्रामस्थांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. ही विदारक परिस्थिती गेल्या १५ वर्षांपासून नागरिकांना सतावत आहे. अनेकदा तक्रार करूनही महापालिका कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वाघबीळ गावात जाताना प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर सांडपाणी दररोज साचले जात आहे. या पाण्यातून वाट काढताना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तोंडाला रुमाल बांधून जावे लागत आहे. गेली १५ वर्षे गावकऱ्यांना रस्ताच नसल्याने ते वैतागले आहेत.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील वाघबीळ एक परिसर आहे. काही दिवसांपूर्वी गावात तरण तलावाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या सरनाईक यांना देखील याच पाण्यातून वाट काढावी लागली अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी, आंदोलने केली मात्र कोणताच तोडगा काढण्यात आला नाही. गावात येण्यासाठी सुसज्ज रस्ता नाही, रस्त्यावर सांडपाणी साचत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अनेकदा अपघाताच्या देखील घडल्या आहेत, महत्वाचे म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी देखील गावातीलच असून ते देखील याच सांडपाण्यातून अनेकदा प्रवास करतात, फरक एवढाच आहे की लोकप्रतिनिधी आपल्या आलिशान गाडीतुन जातात, तर सामान्य नागरिकांना याच घाण पाण्यातून प्रवास करावा लागतो, असे एका नागरिकाने सांगितले.