ठाणे: कल्याण-डोंबिवली पाठोपाठ ठाण्यातही बिनविरोध विजयाचा रथ धावला असून शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे एक-दोन नव्हे तर सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील ही उमेदवार आहेत.
ठाणे महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणून शिवसेना शिंदे गट आणि भाजप निवडणुकीला सामोरे जात आहे. अशातच १५ जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत ठाणे पालिकेच्या ३३ प्रभागांसाठी १,१०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननी प्रक्रियेत ९९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. तर, १ जानेवारीला २७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. यामुळे ८९१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २ जानेवारीला अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून यामुळे वागळे इस्टेट तसेच वर्तकनगर भागातील शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमदेवार बिनविरोध निवडून आले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील वागळे इस्टेट पट्टयातील प्रभाग क्रमांक १८ मधील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार जयश्री फाटक, सुखदा मोरे आणि राम रेपाळे हे तिघे विजयी झाले आहेत. तर, या प्रभागातील उमेदवार दिपक वेतकर यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लोहाटे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात यश आले नसल्याने वेतकर हे बिनविरोध होऊ शकले नाहीत.
दरम्यान, सावरकरनगरमधील प्रभाग क्रमांक १४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार अरुणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर, मनसेच्या उमेदवार रेश्मा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. यामुळे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या उमेदवार शीतल ढमाले या बिनविरोध निवडून आल्या. तसेच किसननगर येथील प्रभाग क्रमांक १७ मधून एकता भोईर तर, वर्तकनगर येथील प्रभाग क्रमांक ५ मधील शिवसेना (शिंदे गट) जयश्री डेव्हीड आणि सुलेखा चव्हाण या सुद्धा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
सुधाभाईंच्या वाढदिवशी आनंदाची बातमी-सुलेखा चव्हाण
प्रभाग पाचमधून बिनविरोध निवडून आलेल्या शिवसेनेचा उमेदवार श्रीमती सुलेखा चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असताना त्या भावुक झाल्या होत्या. ‘आज भाईंचा (पती स्व. सुधाकर चव्हाण) यांचा वाढदिवस आहे. मला मिळालेले यश हा त्यांनीच दिलेला आशीर्वाद आहे’ असे त्या म्हणाल्या.
कै. सुधाकर चव्हाण शिवाई नगर भागातील ज्येष्ठ नगरसेवक होते. श्रीमती चव्हाण त्यांच्या सर्व सार्वजनिक उपक्रमांत खांद्याला खांदा लावून कार्यरत असत. ‘सामाजिक कामाची मला सवय होतीच. प्रभागातील बहुसंख्य नागरिकांशी आमचे पारिवारिक संबंध आहेत. मी निवडून येण्याची खात्री होतीच, परंतु बिनविरोध विजय झाल्यामुळे मी मतदारांची आभारी आहे.’, असे त्या म्हणाल्या.
संधी दिली, विकासकामातून उतराई होणार-शीतल ढमाले
‘आमची चौथी पिढी शिवसेनेचे काम करत आली आहे. लोकमान्य नगरमधील शिवसैनिकांनी माझ्या विजयाकरिता प्रार्थना केली होती म्हणूनच पहिल्याच वेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरून बिनविरोध निवडून आले,’ अशी प्रतिक्रिया प्रभाग क्र १४मधून बिनविरोध विजयी झालेल्या शीतल ढमाले यांनी दिली आहे.
या विजयामुळे आनंद गगनात मावत नाही. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामुळेच मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करण्याची जबादारी माझी असून आमच्या पॅनल मधिल वरिष्ठ नगरसेवक तसेच सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली प्रभागातील नागरी सुविधांची कामे करणार असल्याचे सौ. ढमाले यांनी सांगितले.
माझे सासरे शिवसेनेचे काम करत होते. माझे पती शिवसेनेचे काम करत आहेत. आम्ही हाडाचे शिवसैनिक असून या विजयाचे श्रेय माझे पती, प्रभागातील शिवसैनिक महिला आघाडीच्या सैनिक प्रभागातील मतदार यांना देते, असे सौ. ढमाले यांनी सांगितले.