महापौर पदासाठी चर्चेत सात; चुरस मात्र जानकर-भोईर यांच्यात!

ठाण्यात तब्बल ३० वर्षांनी अनुसूचित जातीसाठी आरक्षण

ठाणे: ठाणे महापालिकेचे महापौर पद अनुसुचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले असून तब्बल ३० वर्षांनी अनुसूचित जातीला बहुमान मिळणार आहे. त्यामुळे महापौर पदासाठी शिवसेनेतील डॉ. दर्शना जानकर, विमल भोईर, दीपक जाधव यांची नावे चर्चेत आहेत. १९९६ साली मनोहर गाढवे यांच्या रुपाने अनुसूचित जाती प्रवर्गातील महापौर ठाण्याला मिळाला होता.

ठाणे महापालिका निवडणूक संपल्यानंतर महापौर पदाच्या शर्यतीमध्ये अनेक दिग्गज होते. मात्र हे पद अनुसुचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्याने महापौर होण्याचे अनेकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. तर शर्यतीमध्ये कधीच नसलेल्यांची ‘लॉटरी’ लागणार आहे. विशेष म्हणजे अनुसुचित जातीच्या नगरसेवकांपेक्षा नगरसेविकांची संख्या जास्त आहे. जुन्या जाणत्या नगरसेविकांसह पहिल्यांदाच निवडणूक लढवून सभागृहात येणार्‍या नवख्या नगरसेवकांनाही अनपेक्षित महापौर बनण्याची संधी चालून आली आहे. डॉ. दर्शना जानकर, विमल भोईर, पद्मा भगत, आरती गायकवाड आणि वनिता घोगरे या पाच नावांची चर्चा आहे. मात्र खरी चुरस अनुभवी विमल भोईर आणि नवख्या पण उच्चशिक्षित डॉ. दर्शना जानकर यांच्यातच आहे. या आधी दिव्याला महापौरपद मिळाले नसल्याने दीपक जाधव यांच्या रुपाने दिव्याला महापौरपदाचा सन्मान मिळू शकतो.

ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागातील १३१ नगरसेवक पदांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली असून शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक ७५ नगरसेवक निवडून आणले आहेत. त्यामुळे ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा महापौर निर्विवाद बसणार आहे. पण महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले होते. आरक्षण जाहिर झाल्यानंतर यासंदर्भातला पहिला सस्पेन्स संपला आहे. महापौर पद अनुसुचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे. पालिका निवडणुकीत या प्रवर्गासाठी ९ जागा आरक्षित होत्या. त्यापैकी पाच जागा या महिलांसाठी तर चार सर्वसाधारण गटासाठी होत्या. या नऊ पैकी सात नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी शिवसेनेकडे अर्धा डझन नावे आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक ९ अ मधील गणेश कांबळे आणि प्रभाग क्रमांक २८ अ मधील दिपक जाधव हे दोन पुरुष नगरसेवक वगळता पाच महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेत महिला राज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नगरसेविका डॉ. दर्शना जानकर या प्रभाग क्रमांक १६ अ मधून निवडून आल्या आहेत. नगरसेवक योगेश जानकर यांच्या त्या पत्नी असून त्यांनी यावेळी पहिल्यांदाच निवडूक लढवून ती जिंकली आहे. जानकर कुटुंब हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाते. त्यात दर्शना जानकर या एमएससी डॉक्टर असल्याने उच्चशिक्षित चेहरा हा ठरू शकतो. विमल भोईर यांचे नावही महापौर पदासाठी चर्चेत आले आहे. वर्तकनगर येथून सलग दुसऱ्यांदा निवडून येणार्‍या त्या नगरसेविका आहेत. सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. प्रभाग क्रमांक ३ अ मधील पद्मा भगत यासुद्धा शर्यतीत आहेत. पण या प्रभागातून गेल्यावेळी मीनाक्षी शिंदे यांना महापौर बनण्याचा मान मिळाला होता. त्यामुळे पुन्हा त्याच प्रभागाला हा बहूमान मिळेल याची शक्यता कमी दिसते.

वनिता घोगरे आणि आरती गायकवाड या दोन्ही नगरसेविका दुसर्‍यांदा निवडून आल्या आहेत. मात्र त्या राष्ट्रवादीतून शिवसेना शिंदे गटात आल्याने त्यांना संधी मिळेल असे दिसत नाही. या दोन नावांना विरोध होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग ९ अ चे नगरसेवक गणेश कांबळे आणि प्रभाग २८ अ चे नगरसेवक दिपक जाधव हे आणखी दोन उमेदवार शिंदे गटाकडे आहेत. हे दोघेही सलग निवडून आले आहेत. पण सभागृहात गणेश कांबळे यांचा परर्फामन्स पाहता त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पण दिव्याला या आधी संधी मिळाली नसल्याने दीपक जाधव यांना संधी मिळू शकते.

सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या ७५ पैकी ४० नगरसेविका आहेत. महापौर पद अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाले असून येथेही सहा महिला नगरसेविका असून दोन नगरसेवक आहेत. महापौर पदासाठी सुशिक्षित चेहरा देण्यासोबतच महिला कार्ड खेळल्यास कामकाजात शिस्त येऊ शकते असा विचार केला जाऊ शकतो, किंवा दिव्याला हा बहुमान मिळू शकतो