कल्याणात महापौरपदासाठी सेना-भाजपची पळवापळवी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला एकहाती सत्ता मिळवता आलेली नाही. त्यामुळे महापौर पदासह महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षातील नगरसेवक आपल्या तंबूत आणण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात चढाओढ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे दोन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेनेला कल्याणमध्ये 53 जागांवर यश मिळालं आहे. तर भाजपला 50 जागांवर यश मिळालं आहे. इथे बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला नऊ तर भाजपला 12 नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून ठाकरे बंधूंच्या निवडून आलेल्या 16 नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी नुकतंच खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी सोशल मीडियावर श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचा फोटोदेखील शेअर केला होता. त्यामुळे ठाकरे गट देखील सतर्क झाला आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेले दोन नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. या दोन्ही नगरसेवकांना त्यांच्या घरी जाऊन ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी नोटीस दिली आहे. ठाकरे गटाची उद्या पक्ष गट स्थापनेबाबत बैठक आहे. या बैठकीला उपस्थित राहावे, या बैठकीला उपस्थित न राहिल्यास पक्षविरोधी काम केल्याने पक्षाकडून कारवाई केली जाईल, अशी नोटीस दोन्ही नगरसेवकांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून मधूर म्हात्रे यांच्या वडिलांना तर कीर्ती ढोणे यांच्या बहिणीकडे नोटीस सुपूर्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे नगरसेवक उद्याच्या बैठकीला खरंच उपस्थित राहतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.