‘एफसीआय’च्या संघात ठाणेकर बॅडमिंटपटू सार्थकची निवड

राज्यस्तरीय मनोरा स्पर्धेत अंजना नायरला रौप्य

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया एफ.सी.आय. इंटर झोनल अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या सार्थक रोकडे याने सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही गटांमध्ये चमकदार कामगिरी केल्याने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेस्ट झोनल टीममध्ये सार्थक रोकडेची निवड करण्यात आली आहे.

सार्थकने आपल्या संघासाठी उत्तम खेळाचे सादरीकरण करून त्यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. पुरुष दुहेरीत संघांचे नेतृत्व करताना सार्थकने उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या लढतीत चुरशीची झुंज दिली, परंतु साऊथ झोनच्या संकल्प गुराला आणि अल्विस फ्रान्सिस यांच्याकडून त्यांना हार स्वीकारावी लागली.
वैयक्तिक गटात सार्थकने पुन्हा एकदा उत्तम खेळाचे सादरीकरण करीत सर्वांना आपल्या खेळाची दखल घेण्यास भाग पाडले. त्याने उपांत्य फेरीत धडक मारीत दुसऱ्या मानांकीत जोडीला म्हणजेच कौशिक पाल व दिप्तीमन चौधरी यांना २१-१५, २१-१७ असे सहज हरवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. परंतु अंतिम सामन्यात त्यांना अतिशय अटीतटीच्या सामन्यात मनिष रावत आणि मयंक बहल यांच्या कडून २१-१७, २१-१५, १९-२१ अशा सेट मध्ये हार पत्करावी लागली.

ठाणे महानरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण अकादमीचे ज्युनियर बॅडमिंटनपटू सुद्धा चमकदार कामगिरी करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या व गेली अनेक वर्षे होत असलेल्या अतिशय मानाच्या मनोरा राज्यस्तरीय खुल्या स्पर्धेत ठाणेकर अंजना नायर हिने १३ वर्षाखालील वयोगटात रौप्य पदक जिंकले आहे. लहानणापासूनच ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये धडे गिरवणाऱ्या अंजनाने गतवर्षी हीच स्पर्धा वेगळ्या वयोगटात जिंकण्याची कामगीरी केलेली आणि आता रौप्य पदक प्राप्त करून तिने सातत्य कायम ठेवले आहे. अन्वेशा सिंग हिला उपांत्य फेरीच्या सामन्यात २२-२० असं नमवून अंजानाने अंतिम फेरीत धडक मारली. परंतू अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत तिला हार पत्करावी लागली.

या पदकासाठी व शालेय स्पर्धांमधील उत्तम कामगिरीसाठी अंजनाचा श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेने “ट्रेण्डसेटर ऑफ दी इयर” असा गौरव केला आहे.
या दोंघांच्याही विजयाबद्दल ज्येष्ठ प्रशिक्षक व ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, अक्षय देवलकर व मयूर घाटणेकर, तसेच क्रीडा अधिकारी श्रीमती मिनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने त्यांचे अभिनंदन केले आहे.