बदलापूर: बदलापूर येथील आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या आदर्श विद्या मंदिर माध्यमिक विभाग (मराठी माध्यम) या शाळेच्या नववीमधील विद्यार्थी कणाद प्रभुदेसाई या विद्यार्थ्याची नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षाच्या माध्यमातून इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या परीक्षेमधून 110 विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी पात्र ठरले आहेत. मुंबई विभागामधून फक्त दोनच विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि त्यामध्ये आदर्श विद्यामंदिर शाळेतील कणाद प्रभुदेसाई या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे.
आदर्श शाळेतील विद्यार्थी क्रीडा, साहित्य, विज्ञान अशा विविध स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करून यश संपादन करीत आहेत. या यशाचे सर्व श्रेय आदर्श विद्या प्रसारक संस्था, पालक वर्ग, उपमुख्याध्यापिका सौ. जोशी, पर्यवेक्षिका श्रीमती शेरेकर, सर्व शिक्षक वृंद यांचे आहे असे विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश बुटेरे यांनी याप्रसंगी सांगून सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.