ठाणे: मुख्य बाजारपेठ येथिल महापालिकेच्या प्रदूषण विभागाने मोठा गाजावाजा करून बंद केलेल्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मसाला गिरणी पुन्हा सुरु झाल्याने या भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणाच्या दबावाला महापालिका बळी पडली, असा संतप्त सवाल परिसरात विचारला जात आहे.
मागील आठवड्यात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार मुख्य बाजारपेठ परिसरातील ध्वनी प्रदूषण करणाऱ्या सहा मसाला गिरण्यांना सील लावून त्या बंद करण्यात आल्या होत्या. या भागातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना ध्वनी प्रदूषणाचा तसेच वायू प्रदूषणाचा प्रचंड त्रास होत असल्याने या भागातील व्यापारी आणि नागरिकांनी त्याची तक्रार आमदार संजय केळकर यांच्याकडे केली होती. त्यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता कानाला त्रास होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त श्री. राव यांच्या निदर्शनास नागरिकांना होणारा त्रास आणून दिला होता. त्याची दखल घेऊन आयुक्त श्री. राव यांनी दिलेल्या आदेशानुसार या सहा मसाला गिरण्यांना सील लावण्यात आले होते. त्यामुळे काही जणांनी तक्रारदार नागरिक आणि व्यापाऱ्यांना धमकी दिली होती. या गिरण्या बंद राहतील अशी या भागातील नागरिकांची अपेक्षा होती, परंतु पुन्हा एकदा या गिरण्या सुरु झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या या मसाला गिरण्या कायमस्वरूपी बंद कराव्यात, अशी मागणी आयुक्त श्री. राव यांच्याकडे करण्यात येणार आहे.