थकबाकीदाराविरोधात गुन्हा दाखल कारवाई
ठाणे: आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार मालमत्ता कर वसुलीसाठी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मोहीम सुरू आहे. दरम्यान थकबाकीदार मालमत्ता धारकाने सील केलेले गोडाऊन बेकायदेशीरपणे उघडून ते सुरू केल्याचा प्रकार शीळमध्ये उघडकीस आल्याने कर निरीक्षकांच्या माध्यमातून संबंधित गोडाऊन धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता देखील सील करण्यात येत आहेत. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान शीळ येथील शबाना कंपाऊंडमध्ये पाच लाख एक हजार ९८१ रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असलेल्या एका गोडाऊनवर कारवाई करण्यात येऊन हे गोडाऊन सील करण्यात आले. गोडाऊनधारक हसरत खान यांना तत्पूर्वी तीन दिवसांत कर भरण्याची सूचना ३० जानेवारी रोजी देण्यात येऊन नोटीस बजावण्यात आली. या नोटिसीला न जुमानता हसरत खान यांनी मालमत्ता कर भरला नाही. अखेर १३ फेब्रुवारी रोजी जप्ती वॉरंट काढून अटकावणी करण्यात आली. मात्र संबंधित गोडाऊन धारकाने गोडाऊनला लावलेले सील बेकायदेशीरपणे तोडून पुन्हा व्यवसाय सुरू केल्याचे मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले.
या प्रकरणी कर निरीक्षक ललिता जाधव यांनी शीळ डायघर पोलिस ठाण्यात संबंधित गोडाऊन धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत श्री.नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दिवा प्रभाग समिती हद्दीत आयुक्तांच्या आदेशानुसार मालमत्ता कर वसुलीची मोहीम जोरात सुरू असून थकबाकीदारांना आधी नोटीसा बजावण्यात येत आहेत. तसेच आवश्यक येथे मालमत्ता सील करण्यात येत आहेत. ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे श्री.नागरगोजे म्हणाले.