शहापूर : राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग या दोन महामार्गांवर वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (आज) उघडकीस आली आहे.
समृद्धी महामार्गावरील मुंबईकडील वाहिनीवर कासगाव भागात झालेल्या अपघातात ट्रक चालक विजय उईके (३८) आणि ओंकार पंढरे (३२) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई – नाशिक महामार्गावर चांदे गावा जवळ पहाटे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात पीक-अप वाहनामधील जावेद शेख (३५, धसई, शहापूर) यांचा मृत्यू झाला आहे.
पहिली घटना समृद्धी महामार्गावर उघडकीस आली. मुंबईच्या दिशेने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक आणि त्याचा सहकारी या दोघांचा मृत्यू झाला. विजय उईके आणि ओंकार पंढरे अशी मृतांची नावे आहेत. तर मुंबई-नाशिक महामार्गावर एका पीकअप वाहनामध्ये कॅनमधील डिझेल भरल्यानंतर रस्त्यालगत उभे असणाऱ्या चालकाला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने चालक ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. याबाबत शहापुर पोलीस अधिक तपास करीत आहेत.