ठाणे: बोरीवली रेल्वेच्या हद्दीत अवघ्या पाच वर्षे वयाच्या बालकाचे अपहरण ११ फेब्रुवारी रोजी झाले होते. मात्र २४ तासांत या बालकाची उल्हासनगर येथून आरोपीच्या ताब्यातून सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
गोरेगाव रेल्वे स्थानक येथून 11 जानेवारी 2025 रोजी बालकाचे अपहरण झाले होते. याबाबतचा गुन्हा बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. गुन्हयाच्या तांत्रिक तपासान्वये संबंधित अपहरण केलेले बालक आणि आरोपी हे उल्हासनगर परिसरातील शिवाजी रोड मार्केट, शहाड फाटक परिसरात असल्याचे बोरिवली येथील पोलिस निरीक्षक एस.एस.शिंदे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात फोनद्वारे कळवले. त्यासाठी अपहरण केलेल्या बालकाचे छायाचित्र आणि दाखल गुन्ह्याची माहिती तातडीने फोनद्वारे पाठवली आणि उल्हासनगर पोलीस स्थानकाच्या नेमणुकीतील पोलीस उपनिरीक्षक वाळके तसेच, बीट मार्शल 1 चे हवालदार पी.डी.रूपवते आणि पोलीस हवालदार ई.एम.पाटील यांनी अत्यंत तातडीने बालकाचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. तेथे पोहचले असता पोलिसांनी अपहृत बालक आणि आरोपीचा महात्मा फुले चौक ते शहाड रेल्वे स्टेशन उल्हासनगर परिसरात कसून शोध घेतला. त्यावेळी गुन्हयातील बालक हा, ‘करणरामथिरण कनोजीया रा. गोरेगाव मुंबई आणि धरमपाल रामकिशोर यादव रा.सध्या खोपोली रायगड यांच्यासोबत सापडले. पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
उल्हासनगर पोलिसांनी अत्यंत गोपनीयपणे आणि तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे संबंधित पाच वर्षाच्या बालकाची सुटका झाली आहे आणि पोलिसांचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.