सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा
मॉस्को: रशियाने कॅन्सरवर मात करणारी लस तयार केल्याची माहिती समोर आली आहे. रशियातील फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीने कॅन्सरवरील लस तयार केली आहे. रशियन एंटरोमिक्स कॅन्सरवर मात करणारी लस आता वापरासाठी तयार आहे.
MRNA-आधारित या लसीने सर्व प्रीक्लिनिकल चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या असून तिची सुरक्षितता व परिणामकारकता सिद्ध झाली आहे. या लसीचा प्रारंभीचा उद्देश कोलोरेक्टल कॅन्सर (कोलन कॅन्सर)वर उपचार करणे हा असेल”, असं FMBA च्या प्रमुख वेरोनिका स्क्वोर्सोव्हा यांनी सांगितलं आहे. रशियाच्या टास वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, या कॅन्सर लसीने उत्तमपणे रिझल्ट दिले आहेत. FMBA प्रमुख वेरोनिका स्क्वोर्सोव्हा यांनी याबाबतची घोषणा ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये केली.
स्क्वोर्सोव्हा म्हणाल्या, “ही संशोधनप्रक्रिया अनेक वर्षे चालली, ज्यामधील मागील तीन वर्षे केवळ आवश्यक प्रीक्लिनिकल अभ्यासासाठी दिली गेली. लस आता वापरासाठी तयार आहे. आम्ही अधिकृत मान्यतेची प्रतीक्षा करत आहोत.” पुढे बोलताना त्या म्हणाल्या, , प्रीक्लिनिकल चाचण्यांनी या लसीची सुरक्षितता तसेच वारंवार वापरानंतरही टिकून राहणारी परिणामकारकता याची खात्री दिली आहे. या दरम्यान संशोधकांनी ट्यूमरचा आकार घटताना व त्याच्या वाढीचा वेग कमी होताना पाहायला मिळाला. याशिवाय, लसीमुळे रुग्णांच्या जिवंत राहण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे अभ्यासातून दिसून आले.
रशियाने बनवलेल्या या लसीचं पहिलं लक्ष्य कोलोरेक्टल कॅन्सर असला तरी, ग्लिओब्लास्टोमा (ब्रेन कॅन्सर) आणि विशिष्ट प्रकारच्या मेलेनोमासाठी, विशेषतः ऑक्युलर मेलेनोमा (डोळ्याचा एक प्रकारचा कॅन्सर) यासाठीही लसी तयार करण्याच्या दिशेने आशादायक प्रगती झाली आहे. या लसी सध्या त्यांच्या प्रगत टप्प्यात आहेत. दहावे ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम 3 ते 6 सप्टेंबरदरम्यान व्लादिवोस्तोक येथे ‘द फार ईस्ट: को ऑपरेशन फॉर पिस अँड प्रॉस्पेरिटी’या विषयावर पार पडले. या व्यासपीठावर 75 हून अधिक देश व प्रदेशांतील 8,400 हून अधिक मान्यवर सहभागी उपस्थित होते.