रांगा आणि शुकशुकाट !

टँकर चालकांच्या बंदमुळे पेट्रोल पंप ओस पडले

ठाणे: केंद्राच्या हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक टँकर चालकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला असून त्याचे थेट पडसाद पेट्रोल पंप आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटले. आज दुसऱ्या दिवशी पेट्रोल भरण्यासाठी ठाण्यातील सर्व पंपांवर वाहनांची जत्रा पाहायला मिळाली तर संध्याकाळपर्यंत पेट्रोल संपल्याने सर्व पंपांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.

बंदमुळे ठाणे शहरात मंगळवारी सकाळपासून पेट्रोल खरेदी करण्यासाठी अनेक पंपांवर असंख्य वाहनांची गर्दी झाली होती. तेथे गर्दी झाल्याचे पाहून असंख्य चालकांनी इतर पंपांकडे वाहने वळवली. तेथे सर्वप्रकारच्या वाहनांची गर्दी झाल्यामुळे एका वाहनात इंधन टाकण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटे थांबावे लागते, अशी माहिती तीन पेट्रोल पंपाच्या मालकांनी दिली.
गोंधळ सुरु झाल्यावर पेट्रोल पंप बंद झाल्यानंतर कोलाहल सुरु झाला. ही माहिती पोलीस आयुक्तालयापर्यंत पोहचल्यानंतर सर्व पंपांच्या मालकांना पंप त्वरीत बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे अनेक चालक पंप कुठेतरी मिळेल, या आशेने भरकटत होते.

गेल्या शनिवारी टँकर आलेच नव्हते. त्यातच रविवारपासून गेल्या दोन दिवसांत पेट्रोलचा एकही टँकर शहरात न आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याने ब-याच चालकांनी पुढच्या दिवसांची ‘बेगमी’करुन ठेवली आहे, असे दृष्य सर्वप्रथम शेल कंपनीवर आढळले. सर्व्हिस रोडवरील ‘शेल’च्या पंपावर इंधन मिळते, अशी माहिती कानोकानी झाल्यानंतर असंख्य चालक तेथे पोहचले. मात्र तेथेही वाहनांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे प्रत्येकजण पंपापर्यंत जाण्याकरीता ‘घुसत’ होते. त्यावरुन वादावादी, ढकलाढकली सुरु झाल्याने नौपाडा पोलिसांनी तेथे त्वरीत परिस्थिती आटोक्यात आणली. अखेरीस हा पंप बंद करण्याची वेळ आली.

राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर हाच प्रकार झाल्याने पोलीसांना तेथे थांबावे लागले.
हेच दृष्य तीन पंप, बाबूभाई आणि कापूरबावडी, कासारवडवली पंपांवर दिसले. मात्र कापूरबावडी येथे सर्व प्रकारच्या वाहनांसह टँकर्सही आढळले. हे दृष्य बुधवारी आढळणार नाही, असे तेथील संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले.