डोंबिवली बालभवनमध्ये येत्या शनिवार- रविवारी गुलाबप्रदर्शन

डोंबिवली : कॅबिनेटमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून गेली 14 वर्षे डोंबिवलीत “डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल” सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीही येत्या शनिवार-रविवारी हा गुलाबप्रदर्शन सोहळा डोंबिवलीकरांना गुलाब फुलांच्या सुगंधी वातावरणात अनुभवता येणार आहे.
 
पूर्वेकडील रामनगर येथील बालभवनमध्ये शनिवार 10 फेब्रुवारी आणि रविवार 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 पासून रात्री 10 वाजेपर्यंत डोंबिवलीकर गुलाबप्रदर्शन आयोजित केले आहे. इंडियन रोझ फेडरेशन या अखिल भारतीय गुलाबप्रेमींच्या संस्थेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली रोझ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे बॉम्बे रोझ सोसायटी आणि इनरव्हील क्लब, कल्याण यांचे बहुमूल्य योगदान आहे.  महाराष्ट्रातील प्रमुख गुलाब लागवड करणाऱ्या नामांकित व्यक्तींना याठिकाणी आमंत्रित केले आहे. पुणे, वांगणी, शहापूर बरोबरच खास नागपूर आणि नाशिक येथील गुलाब उत्पादक शेतकरी मुद्दामहून येतात. विशेष म्हणजे राष्ट्रीय गुलाब प्रदर्शनातील पारितोषिक विजेते प्रमुख गुलाब उत्पादक वांगणीचे आशिष मोरे व चंद्रकांत मोरे तसेच सरळगावचे डॉ.विकास म्हसकर यांच्या बागेतील गुलाब हे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.