शेकडो वाहनांना मिळाले पाच मजली वाहनतळ
ठाणे: वागळे भागातील व्यवसायिक आणि नागरिकांची पार्किंगच्या समस्येतून काही प्रमाणात सुटका होणार आहे. या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बांधलेल्या पहिल्या बहुस्तरीय वाहनतळाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
वागळे परिसरात आयटी उद्योगांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे तसेच नागरिकरण देखिल वाढले आहे. मात्र वाहनांच्या पार्किंगची सोय नव्हती. त्यामुळे रस्त्यावर वाहने उभी केली जात होती. परिणामी वाहतूक कोंडीचा सामना साऱ्यांनाच करावा लागत होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पी -४२या भूखंडावर सुमारे ३४ कोटींचा निधी खर्च करून पाच मजली वाहनतळाची इमारत बांधण्यात आली आहे. त्यामध्ये अडीचशे कार, दीडशे रिक्षा,१४६ दुचाकी आणि ४३ सायकल अशा ५८९ वाहनांची सोय करण्यात आली आहे. येथे इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रत्येक मजल्यावर चार्जिंगची सोय करण्यात आली आहे. तसेंच स्वच्छता गृह आणि दोन लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरातील एवढे मोठे हे पहिले वाहनतळ उभारून ते नागरिकांना खुले करण्यात आले आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. राज्यात उद्योगांना गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण आहे. आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. उद्योगांना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. हे सरकार गतिमान सरकार आहे. आपण सर्वांनी गतिमानतेने कामे केली पाहिजेत. आज महाराष्ट्र एफडीआयमध्ये क्रमांक एकचे राज्य आहे. उद्योगांसाठी असलेली ध्येय-धोरणे सुटसुटीत असली पाहिजेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळ इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था वाढविली पाहिजे, असेही श्री.शिंदे म्हणाले.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी हा आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. गेले 16 महिने हा महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीमध्ये एक नंबरला आहे. हे सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाल आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मागणी करण्याअगोदरच त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत.
यावेळी मंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना 350 टॅब देण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात काही पाल्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यापुढे दरवर्षी 8 ते 10 मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना टॅब वाटपाचे धोरण जाहीर करण्यात आले. औद्योगिक विकास महामंडळातील 450 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा” (मेडीक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. या विम्याचे हप्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपिन शर्मा यांनी केले.