ब्रेकडाऊन वाहनांनी अडवली ठाण्यातील रस्त्यांची वाट

वर्षभरात बंद पडलेल्या २०७९ वाहनांमुळे वाहतूक झाली कोंडी
ठाणे: ठाण्यात होणाऱ्या वाहतुक कोंडीला अपुरे रस्ते, खड्डे आणि सतत सुरु असलेली विकासकामे कारणीभुत ठरत असली तरी भररस्त्यात बंद पडणारी जड-अवजड आणि हलकी वाहनेही तितकीच जबाबदार आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मागील वर्षभराच्या कालावधीत रस्त्यांत बंद पडलेली तब्बल २०७९ नादुरुस्त वाहने क्रेनद्वारे टोविंग करावी लागली आहेत. वर्षभरात नऊ उपविभागात वाहने बंद पडल्याचे एकुण पावणेतीन हजार कॉल आले असून यात मुंब्य्राखालोखाल कासारवडवली युनीटमध्ये सर्वाधिक कॉल आले आहेत, अशी माहिती ठाणे शहर वाहतुक शाखेकडून देण्यात आली आहे.
मुंबईपाठोपाठ वेगाने विकसीत होत असलेल्या ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाढत्या नागरिकरणासोबतच वाहनांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे. आणि तुलनेने दळवळणासाठी रस्ते अपुरे आहेत. त्यातच रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि मेट्रो तसेच, रस्ते रुंदीकरण व अन्य विकासकामांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अशातच भर रस्त्यात बंद पडणाऱ्या तसेच अपघातग्रस्त वाहनांमुळे वाहतुक कोंडीमध्ये भर पडते. त्यामुळे, वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच बंद पडलेली ब्रेकडाऊन वाहने उचलण्याचे मोठे आव्हान वाहतुक पोलिसांसमोर असते. यासोबतच ऊन,वारा,पावसात अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वाट करून देताना पोलिसांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते.
वाहतुक शाखेकडे स्वतःची क्रेन सुविधा उपलब्ध नसल्याने समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून क्रेन सुविधा उपलब्ध केली जाते.
नौपाडा विभागातील तीनहात नाका उड्डाणपुलावर, कळवा क्षेत्रात खारेगाव टोलनाक्यानजीकचा यु टर्न आणि खारीगाव कट येथे वाहने बंद पडतात. मुंब्रा आणि कासारवडवली क्षेत्र घाट सेक्शनमध्ये आहे, दोन्ही स्थानावरून सर्वाधिक कॉल येतात. कोपरी युनीटमध्ये टोलनाका ते कोपरी पुलापर्यत, वागळे उपविभागात कॅडबरी उड्डाणपुलावर नितीन जंक्शनच्या चढणीला वाहने बंद पडतात. सर्वाधिक उड्डाणपुलांची संख्या असलेल्या कापुरबावडी क्षेत्रातील माजिवडा पुलावरील अवघड यु टर्न, मुंबई-नाशिक-मुंबई मार्गावरील पुल आणि वाय जंक्शनला सर्वाधिक वाहने बंद पडतात. तर, नारपोली युनिटमध्ये गोदामांची संख्या अधिक असल्याने अवजड वाहतुक सुरू असते. या क्षेत्रात माणकोली ते पिंपळसर खिंडीत आणि कशेळी, काल्हेर पुलावर तसेच कोनगावमध्ये पिंपळास ते ओवळी खिंडीत वाहने बंद पडतात.
१ जानेवारी ते १२ डिसेंबर या काळात बंद पडलेली वाहने
नौपाडा २४९, कळवा ३८८, मुंब्रा २६०, कोपरी ४१, वागळे ३४, कापूरबावडी २४५, वडवली ३१०, नारपोली ३४८, कोनगाव २०४
१ जानेवारी ते १२ डिसेंबर २०२५ या वर्षभराच्या कालावधीत नऊ उपविभागात वाहने बंद पडल्याचे २७५४ कॉल आले असून एकुण २०७९ वाहने क्रेनद्वारे टोविंग करण्यात आली आहेत. यात १८४७ ट्रक व मल्टीएक्सल वाहने असून २३२ बसेसचा समावेश आहे.