राजीनामा द्या, माझ्याबरोबर ठाण्यात लढा – आदित्य ठाकरे

ठाणे : सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे हे महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाहीत. हिंमत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
आदित्य ठाकरे हे रविवारी सायंकाळी शाखांना भेटी देण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, ठाण्यात येतो तेव्हा जुन्या आठवणी येतात. ठाणेकरांनी खूप प्रेम दिले आहे, गद्दार गेले पण ठाणे शिवसेनेचेच राहिले आहे. सध्या खोटे बोला पण रडून बोला अशी नवी फॅशन झाली. रडायचे आणि जे पाहिजे ते मिळवायचे असे अनेकवेळा मी पाहिले आहे. काल देखील ते रडले. तुम्ही शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलात. पण माणूस म्हणून पण अपयशी ठरलात असा थेट आरोप त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. भाजप आत टाकेल म्हणून २० मे २०२२ ला तुम्ही रडले होते असेही ते म्हणाले. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व दिले. त्या व्यक्तीचे वडिल, पक्ष चोरण्याचा प्रयत्न तुम्ही केला. तुमच्या डोक्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

तुम्हाला जेवढा मोकळा हात दिला, तेवढा कोणाला दिला नव्हता. पण तुम्ही विश्वासघात केला. महाराष्ट्रात नवा उद्योग अडीच वर्षात आलेला नाही. रोजगार, नोकऱ्या उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठविले आहेत. मंत्रालय देखील गुजरातला हलवतील. जाहिरांतीवर खर्च होतो. येथे विकास स्वत:चा, कंत्राटदार यांचा होतो. पण सामान्य नागरिकांचा विकास होत नाही. दुकानदारांकडून वसूली केली जाते. यांच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. पण शेतात दोन हेलिकाॅप्टर उतरतात. हे शेतीपण अमावस्या किंवा पौर्णिमेला करतात, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.