बोरीवडे परिसरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
ठाणे: घोडबंदर रोडवरील बोरिवडे गाव परिसरात सुरू असलेल्या आरएमसी बॅचिंग प्लांटमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आरएमसी बॅचिंग प्लांटमुळे वाढती धूळ आणि ध्वनी प्रदूषण, वाहतुकीतील अडथळे आणि आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात लढ्याची तयारी केली आहे. रहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे. बॅचिंग प्लांटमधून उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांना श्वासोच्छवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असलेल्या कामामुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे
या मुद्द्यावर शिवसेनेचे विभागप्रमुख रवी घरत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पोलीस ठाण्यात जाऊन थेट निवेदन दिले आहे. यावेळी उपविभाग प्रमुख मंगेश कदम शाखाप्रमुख सुमित भोसले, संजय अंभोरे यांच्यासह स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी, सोसायटी सभासद उपस्थित होते. ताबडतोब बॅचिंग प्लांट बंद करावा आणि काम किमान दोन ते चार तास बंद ठेवावे, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
या लढ्याला रौनक डिलाईट, विहंग व्हॅली फेज एक आणि दोन प्लॅटिनम लॉन्स, रौनक हाइट्स, उन्नती ग्रीन्स या सोसायट्यांनी पाठिंबा दिला आहे.