बाळकुममध्ये अनधिकृत इमारतीवर कारवाईदरम्यान रहिवाशांचा राडा

* रहिवासी महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले
* महापालिकेचे पथक हात हलवत परतले

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरु असून सोमवारी दुपारी बाळकूम येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

इमारत बांधेपर्यंत महापालिका झोपली होती का ?असा प्रश्न उपस्थित करत या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध केला. इमारतीपर्यंत जाणारा रस्ताच नागरिकांनी अडवला तर काही महिलांनी अंगावर रॉकेल ओतून कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या रोषाचा सामना करणे अवघड झाल्याने अतिक्रमण पथकाला अखेर कारवाई न करताच हात हलवत परतावे लागले.

ठाण्यातील बाळकूम पाडा न. १, दादलानी रोड या ठिकाणी जय गजानन हाईटस नावाची आठ मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये ३० पेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान ठाणे महापालिकेचे पथक या ठिकाणी कारवाईला पोहोचले. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. कारवाईसाठी पालिकेचे पथक या ठिकाणी पोहोचताच इमारतीमधील सर्व नागरिक खाली उतरले आणि पालिकेच्या कारवाईला विरोध केला. ठाणे महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे आणि स्वतः अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गजानन गोदापुरे हे देखील कारवाईच्या ठिकाणी हजर झाले. यावेळी गोदापुरे आणि स्थानिक रहिवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. या कारवाईला विरोध केल्याने नागरिकांची चूक दाखवण्याचा प्रयत्न उपायुक्त गोदापुरे यांनी केला. मात्र इमारत बांधेपर्यंत ठाणे महापालिका झोपली होती का ? असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केला. यावेळी पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण पथकाने इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी काही महिलांनी आपल्या अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. काही रहिवासी हे इमारतीच्या छतावर असल्याने त्यांनी इमारती खाली उडी मारण्याचा इशारा दिला. नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यांनतर अखेर पालिकेने नमती भूमिका घेत कारवाई न करताच पालिकेच्या पथकाला खाली हात परतावे लागले.

पूर्वीची इमारत ही धोकादायक झाल्याने पाच वर्षांपूर्वी ही आठ मजली इमारत बांधण्यात आली होती. ठाणे महापालिकेने कारवाई करण्यापूर्वी आम्हाला पर्यायी घरे उपलब्ध करून द्यावीत त्यानंतरच कारवाई करावी अन्यथा ठाणे महापालिकेला कारवाई करू न देण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. दरम्यान रहिवाशांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर पुन्हा कारवाईला सुरुवात होणार असल्याची माहिती उपायुक्त गोदापुरे यांनी दिली आहे.

अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष प्रशासनाला भोवले

माजिवडे-मानपाडा हद्दीत आजही अनधिकृत बांधकामे सुरू असून काही ठिकाणी दाखवण्यापुरती कारवाई करण्यात येत आहे. थेट रस्त्यावर करण्यात आलेल्या बांधकामांबाबत आयुक्तांना पाच पत्रे देण्यात आली आहेत. आयुक्तांनी त्याबाबत सहायक आयुक्तांना निर्देशही दिले आहेत. मात्र तरीही या प्रभागाचे सहायक आयुक्त कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा दुर्लक्षामुळेच रहिवाशांचा विरोध टोकाला जातो. त्यामुळे येथील सहायक आयुक्तांवरच कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.