रोज पाच लाख लिटर पाण्याची कमतरता
ठाणे: हावरे सिटी या भव्य गृहसंकुलात सहा हजाराहून अधिक नागरिक राहत असून त्यांना गरजेपेक्षा निम्मा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्यासाठी त्यांना महिन्याकाठी २५ लाखांची पदरमोड करावी लागत आहे. याबाबत रहिवाशांनी त्यांची संतप्त भावना स्थानिक नगरसेवकांना पत्राद्वारे कळविली असून येत्या महासभेत पाण्याचा प्रश्न पेटणार असल्याचे दिसते.
कासारवडवली येथील हावरे सिटी को-ऑप. हाउसिंग सोसायटी फेडरेशन अंतर्गत नऊ गृहसंकुले असून येथे सहा हजारहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. येथील कुटुंबांना दररोज नऊ ते दहा लाख लिटर पाण्याची गरज असून प्रत्यक्षात मात्र चार ते पाच लाख लिटर पाण्याचाच पुरवठा महापालिकेकडून होतो. त्यामुळे नागरिकांचे गेली अनेक वर्षे हाल होत आहेत. एकीकडे पाणी बिलापोटी महापालिकेला लाखो रुपयांचा भरणा होत असताना दुसरीकडे खासगी टँकरद्वारे पाणी खरेदी करण्यासाठी महिन्याकाठी २५ लाख रुपये या नागरिकांना खर्च करावे लागत असल्याचे पत्र फेडरेशनने स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर आणि अनिता ठाकूर यांना दिले आहे.
याबाबत नगरसेविका अनिता ठाकूर यांनी महापौरांना पत्र देऊन या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. एकीकडे जुन्या गृहसंकुलांना पुरेसे पाणी मिळत नसताना नवीन बांधकामांना परवानग्या कशा दिल्या जातात? भविष्यात नवीन बांधकामांना पाणीपुरवठा कसा करणार? असे प्रश्न उपस्थित करत येत्या महासभेत हावरे सिटीमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे ठाकूर यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.