ठाणे : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मुर्ती प्रतिष्ठापना या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रामाचा जप सुरू असतानाच, आता ठाणे शहरातील गृहसंकुलांमध्येही श्रीरामाचा जागर सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
अनेक गृहसंकुलांमधील इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई, भगवे झेंडे, प्रवेशद्वारावर कमानी आणि कंदील लावण्यात आलेले असून त्याचबरोबर याठिकाणी दररोज रामाची आरती, भजन आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामुळे गृहसंकुलांमधील वातावरण राममय झाल्याचे दिसून येत आहे.
आयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शिवसेना, भाजप आणि संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शहरात ठिकठिकाणी राम कथा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर श्री रामाची पालखी मिरवणूक, रामायण महोत्सव, तलाव परिसरात आरती, व्याख्यान, अशा कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यात आठवडाभर रामाचा जप सुरू आहे.
राम मंदिराचे उद्घाटन होईपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. मंदीर उद्घाटनाच्या दिवशी विविध संस्थांकडून दिपोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे. शहरातील गृहसंकुलांमध्ये राम मंदिराची प्रतिकृती असलेला रथ नेऊन घराघरांमध्ये अक्षतांचे वाटप करण्यात येत आहे. या संकुलांच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्रीरामाचे चित्र असलेले भगवे झेंडे लावण्यात येत आहेत. असे असतानाच, आता शहरातील अनेक गृहसंकुलांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.