नवी मुंबई: नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात एका कामगाराच्या बुटात लपून बसलेल्या नागाची सुटका करण्यात आली. वाईल्डलाईफ रेस्क्यूअर अक्षय दांगे यांनी मोठे धाडस दाखवत या नागाची सुटका केली.
पावसाळ्यात घरात कोरड्या जागेचा शोध घेत हे सर्प असे आश्रय घेतात. अशीच घटना महापे एमआयडीसीत घडल्याची घटना घडली. एका कामगाराने आपले बूट घालण्यापूर्वी आत काहीतरी हलत असल्याचे लक्षात येताच तातडीने सर्पमित्र अक्षय दांगे यांना बोलावण्यात आले. त्यांनी काळजीपूर्वक निरीक्षण करून, बुटात लपलेल्या सुमारे चार फूट लांब नागाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि नंतर जंगलात सोडून दिले.
यावेळी सर्प मित्र अक्षय दांगे यांनी सांगितले की, “पावसाळ्यात साप घरात येतात कारण त्यांना कोरडं व सुरक्षित ठिकाण हवं असतं. त्यामुळे बुट, कपाटं, पलंगाखालची जागा यांसारख्या ठिकाणी साप लपतात. नागरिकांनी काळजी घेऊन, पावसाळ्यात आपले बूट घालण्याआधी ते नेहमी तपासावेत.सदर नाग विषारी असून महाराष्ट्रात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक आहे. वेळेवर लक्ष देऊन आणि योग्य रेस्क्यू केल्यामुळे संभाव्य धोका टळला.तर नाग दिसल्यास घाबरून जाऊ नये, तसेच स्वतः हाताळण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन अक्षय दांगे यांनी केले आहे.