रात्री दहानंतर कंपन्या सोडतात दूषित वायू
नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका शहराला स्वच्छतेत अग्रेसर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच शहरात रात्रीच्या वेळी वायू प्रदूषण होत असल्याने स्वच्छ शहरात स्वच्छ हवा मिळणे दुरापस्त झाले आहे. नवी मुंबई शहराला पडलेला प्रदूषणाचा विळखा सुटणार कधी? असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे शहरात स्वच्छता ठेवण्यात येत असली तरी दुसरीकडे अद्याप शहरात औद्योगिक कंपन्यांमधून रात्रीच्या वेळी रसायन मिश्रित वायू सोडून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण केले जात आहे. रात्री १० ते ११ नंतर एमआयडीसीमधील कंपन्या हवेत दूषित वायू सोडत असून याचा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. स्वच्छतेमध्ये नवी मुंबई गरुड झेप घेत आहे, मात्र नवी मुंबईकर प्रदूषणाच्या विळख्यातून कधी सुटणार? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
औद्योगिक वसाहतीतील रबाळे, पावणे येथील कंपन्या मोठ्या प्रमाणावर हवेत रसायन मिश्रित वायू सोडतात. उग्र वासामुळे श्वास घेताना अडचणी निर्माण होत आहेत. उलटी, मळमळ या शारीरिक त्रासांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. वाशी, बोनकोडे, कोपरी गाव, कोपरखैरणे, घणसोली हे विभाग औद्योगिक वसाहतीला लागून आहेत. त्यामुळे या विभागात वायुप्रदूषणाचा अधिक परिणाम जाणवत आहे.
प्रदूषण मंडळाकडून हवा गुणवत्ता निर्देशांक मोजमाप चुकीचे दाखवून पर्यावरणासोबत खेळ खेळला जात आहे. लोकांना फसवून हवा स्वच्छ असल्याचे भासवतात, परंतु रात्री होत असलेल्या वायू प्रदुषणाकडे दुर्लक्ष करून प्रत्यक्षात लोकांचे आरोग्य धोक्यात टाकत आहेत, त्यामुळे नागरिकांनी आता जागे होण्याची वेळ आली आहे, असे आवाहन सेक्टर २६ वाशी येथील रहिवासी प्रो. विनील कुमार सिंग यांनी केले आहे.