आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत मांडली लक्षवेधी
ठाणे : ठाणे शहरातील नियोजित अंतर्गत मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १८ इमारतींच्या पुनर्विकासाला परवानगी देण्याबाबत महिनाभरात पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून विधान परिषदेत आज देण्यात आले.
अंतर्गत मेट्रोचे काम ‘महामेट्रो’कडून काढून ‘एमएमआरडीए’ला देण्याबाबत केंद्र सरकारला विनंतीचे पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
ठाणे शहरातील नियोजित अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार झाला नसतानाही, नौपाडा परिसरातील १८ इमारतींच्या बांधकामांचा पुनर्विकास रखडला आहे. तर वेगाने काम होण्यासाठी हा प्रकल्प `एमएमआरडीए’कडे सोपवावा, या मागणीसाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आदींनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते.
नौपाड्यातील १८ इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी देण्याचा प्रश्न वर्षभरापासून विधान परिषदेत लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून मांडला जात आहे. मात्र, या रहिवाशांना न्याय देण्याऐवजी ‘महामेट्रो’कडून प्रकल्पात सातत्याने अडथळे आणले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईप्रमाणे वेगाने मेट्रोची कामे होण्यासाठी ‘महामेट्रो’कडून ठाणे अंतर्गत मेट्रोचा प्रस्ताव ‘एमएमआरडीए’कडे द्यावा, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली. त्याचबरोबर या इमारतींच्या पुनर्विकासाला परवानगी देण्याबाबत महापालिका सकारात्मक असल्याने संबंधित कामांना ‘ना हरकत दाखला’ द्यावा, अशी मागणीही आमदार निरंजन डावखरे यांनी केली.
ठाणे अंतर्गत मेट्रोचे काम ‘एमएमआरडीए’कडे सोपविण्याचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ जुलै रोजी आणखी एक पत्र केंद्र सरकारला दिले आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
महामेट्रो व महापालिका अधिकाऱ्यांच्या स्तरावर एकत्रित बैठका झाल्याचेही श्री. सामंत यांनी नमूद केले.
‘महामेट्रो’ने संबंधित इमारतींच्या पुनर्विकासाला १४ दिवसात परवानगी न दिल्यास आम्ही संबंधितांना परवानगी देऊ, असे महापालिकेने पत्राद्वारे कळविले असल्याचे बाब खरी आहे का, असा सवालही आमदार डावखरे यांनी केला. त्यावेळी या प्रश्नावर महिनाभरात पाठपुरावा करू, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.