ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात रेकॉर्डब्रेक विकासकामे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समर वंडरलँड फेस्टिव्हलची सांगता

ठाणे: ‘मी मुख्यमंत्री झाल्यापासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात ८५० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आणि त्यातील ४०० कोटींचा फंड रिलीज देखील झाला आहे. सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक अशी विकासकामे आणि मंजुऱ्या या मतदारसंघासाठी दिल्या आहेत’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईला सुशोभित सुंदर व खड्डेमुक्त करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याच धर्तीवर ठाणे सुद्धा खड्डेमुक्त करतोय. म्हणजे आता काँक्रीटचे रस्ते आपण करणार आहोत. आणि ओवळा माजिवड्यात ते काम सुरु झाले आहे. या कामासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी दिला जाईल , कारण तुमच्यातील एक सर्वसामान्य ठाणेकर मुख्यमंत्री तुमच्यासोबत आहे, ठाण्यातील रस्तेही काँक्रीटचे व सुशोभित करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

युवा सेनेचे नेते पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून घोडबंदर येथे ‘समर वंडरलँड’ या चार दिवसीय फेस्टिवल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काल रविवारी या फेस्टिव्हलचा समारोप झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

हजारो लोकांचा प्रतिसाद लाभलेल्या या ‘समर वंडरलँड’चे आयोजक पूर्वेश सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. आपण धकाधकीच्या आयुष्यात धावत असताना थोडा वेळ का होईना, करमणुकीची गरज असते. आमदार प्रताप सरनाईक हे उपवन, मीरा भाईंदरला भव्य कला महोत्सव दरवर्षी भरवतात. ‘समर वंडरलँड’ हा नवीन कार्यक्रम पूर्वेश सरनाईक यांनी सुरु केला आणि तो लोकप्रिय झाला, असे सांगत श्री.शिंदे यांनी कौतुक केले.

ठाणे, मुंबई, भाईंदर असे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मेट्रोचे पूर्ण नेटवर्क पुढील दोन वर्षात तयार होईल. मेट्रो आल्याने ६० ते ७० लाख खासगी वाहने रस्त्यावरून कमी होतील. एसी मेट्रोचा आरामदायी प्रवास करता येईल आणि मुंबई, कल्याण, डोंबविली, ठाणे मेट्रो एकमेकांशी जोडत आहोत. एका मेट्रोमध्ये बसल्यानंतर कुठेही नागरिक त्याच मेट्रोने कुठूनही आपल्या इच्छितस्थळी जाऊ शकतो, असेही श्री.शिंदे म्हणाले.

समारोपाच्या दिवशी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक आणि आयोजक पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेविक परिषा सरनाईक, विहंग सरनाईक, शहर समन्वयक साजन कासार, विभागप्रमुख रवी घरत, माजी नगरसेविका नम्रता घरत आदी उपस्थित होते.